
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर येथील मानधन काढून देण्याच्या अटीवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे गटनीदेशक व निदेशक यांनी चित्रकला निदेशकाला 12 हजार रुपयांची लाच मागितली. लाच स्वीकारताना दोघांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.
फिर्यादी हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे तासिका मानधन तत्वावर चित्रकला निदेशक म्हणून कार्यरत आहे. फिर्यादी यांचे फेब्रुवारी ते मे महिन्या पर्यंतचे वेतन थकले होते, ते वेतन काढून देण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर गट निदेशक म्हणून कार्यरत शांताराम किसनदास राठोड व निदेशक प्रशांत वसंतराव वांढरे यांनी फिर्यादीला वेतन काढून देण्याच्या अटीवर 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
फिर्यादी यांनी याबाबत 11 ऑगस्टला चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची पडताळणी झाल्यावर गुरुवार 18 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन्ही निदेशकाना रंगेहात अटक केली. सदरची कार्यवाही पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, नरेश ननावरे, संदेश वाघमारे, अमोल सिडाम, रवी कुमार ढेंगळे, मेघा मोहुर्ले व सतीश सिडाम यांनी पार पाडली आहे.