जिल्ह्यात ‘कंजक्टिव्हायटिस’चे रुग्ण
खबरदारी घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
विशेष प्रतिनिधी-नागपूर
नागपूर, दि. २५ – सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये डोळे येण्याच्या साथीचे (कंजक्टिव्हायटिस) रुग्ण आढळून येत आहेत. या विषाणूजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.बाह्यरुग्ण विभागामध्ये १०० पैकी १० रुग्ण आणि शालेय विद्यार्थ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात डोळ्यांच्या साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. ही विषाणूजन्य साथ असल्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. डोळ्यांची आग होणे, पापण्या सुजणे, डोळ्यांमध्ये खडे खुपसल्यासारखे होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांमधून पाणी येणे किंवा डोळे चिपडणे यासोबतच सर्दी, ताप आणि खोकला ही लक्षणे सुद्धा आढळू शकतात.
डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल गोंधळलेल्या प्रत्येकासाठी डोळ्यांची काळजी घेण्याच्या काही सोप्या आणि अतिशय व्यावहारिक पद्धती आहेत. सहसा हा डोळ्यांच्या साथीचा आजार पाच ते सात दिवसांमध्ये आटोक्यात येऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साथीने पसरणारा रोग असल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीस वेगळे ठेवावे. संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये तसेच संसर्ग झालेल्या कर्मचा-यांनी कार्यालयात न जाता सुटी घेऊन आयसोलेशन पाळावे. रुग्णांचे कपडे, रुमाल, नॅपकीन व टॅावेल वगैरे वेगळे ठेवावे व धुवावे. वारंवार डोळ्यांना हात लावू नये.
डोळे चोळू नये. संसर्ग झालेल्या व्यक्तीने प्रखर प्रकाश टाळून गॅागल वापरावा. डॅाक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य औषधोपचार करावा. स्वतः किंवा इतर अप्रशिक्षित व्यक्तींकडून उपचार करू नयेत व घरगुती उपाय व औषधी घेऊ नयेत. संसर्ग झालेल्या व्यक्तीने मोबाईल अथवा टीव्ही पाहणे टाळावे.सर्व नागरिकांनी आपली व मुलांची काळजी घेण्याचे व संसर्ग झाल्यास डॅाक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य औषधोपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.