शिक्षकांकडून प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
राळेगाव:-रक्षाबंधन जवळ आले की, उत्सुकता असते ती म्हणजे राखीची. प्रत्येक बहिणीला वाटते की, माझ्या भावाला अतिशय सुंदर राखी बांधावी. माझ्या भावाची राखी सर्वांपेक्षा वेगळी असावी.राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मंगी येथील शिक्षकांनी एक वेगळा उपक्रम शाळेत राबविला. शिक्षकांनी यानिमित्त विद्यार्थ्यांना राखी बनविण्यास शिकवले.
रक्षाबंधनला शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या भावास स्वतः बनवलेली राखी बांधणार असल्याचा संकल्प केला.
त्यासाठी शिक्षक श्री मंगेश कोवळे यांनी स्व खर्चाने राखी बनविण्याचे साहित्य आणून शाळेतच राखी कशी बनवायची? याचे प्रात्यक्षिक श्री मंगेश कोवळे सर व मुख्याध्यापिका अर्चना पेटकर मॅडम यांनी दाखवून विद्यार्थ्यांना राखी बनविण्यास शिकविले.बाजारात विक्रीसाठी विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्या पाहावयास मिळतात. १० रुपयांपासून १०० ते २०० रुपयांच्या राख्याही उपलब्ध आहेत. परंतु, आपल्या हाताने बनवलेली राखी आपल्या भावाला बांधून रक्षाबंधन साजरा करावा,
यासाठी मंगी शाळेत स्वतः राखी तयार करण्याचा उपक्रम शिक्षकांनी घेतला. शाळेतील मुलींनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अतिशय सुंदर राख्या तयार केल्या.तयार केलेल्या राख्या या विकत घेतलेल्या राख्यांपेक्षा अधिक सुंदर आहेत, अशा प्रतिक्रिया शाळेतील विद्यार्थिनींनी दिल्या. याच राख्या आम्ही आमच्या भावाना बांधू असा संकल्पही केला.या उपक्रमाचे खैरी केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख श्री सुरेश कुंभलकर सर यांनी खूप कौतुक केले. विद्यार्थ्यांनी स्वहस्ते आकर्षक राख्या बनवून शाळेत एक वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याने विद्यार्थ्यांचेही कौतुक केले.