नगरपरिषदेच्या मुख्याध्यापक म्हणून आश्वासनांची खैरात
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- शेवगाव शहरातील विविध प्रश्नासंदर्भात शेवगाव शहर नागरी कृती समितीने आज रोजी शेवगाव नगरपरिषद कार्यालयासमोर ‘मुक्काम ठोको आंदोलन’ पुकारलेले होते. यामध्ये आंदोलनकरत्यांच्या सर्व मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष लांडगे व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी कृती समितीच्या सदस्यांना दिले. त्यामुळे आंदोलन यशस्वी होऊन मागण्या मान्य झाल्याचे प्रतिपादन कृती समितीच्या प्रमुख सौ. हर्षदा काकडे यांनी केले.
शेवगाव शहरातील हजारो महिला, पुरुष व युवक या आंदोलनास सकाळी नऊ वाजतापासून जमा होऊन अभूतपूर्व आंदोलनास सुरूवात झाली. यावेळी अनेकांनी प्रभागानुसार विषयवार समस्या मांडल्या. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून उठायचे नाही असे सर्वानुमते ठरले. महिलांनी स्वतःच स्वयंपाकासाठी नगरपरिषदेत चुली पेटवल्या व आंदोलकांसाठी जेवण केले. करमणुकीसाठी पोवाडे, भजने गायले गेले.
पुढे बोलतांना सौ.काकडे म्हणाल्या की, शेवगाव शहराला वाढीव पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे २०१७ मध्ये नियोजन व त्या योजनेला मंजुरी मिळाली. त्यानुसार ०७ जून २०२३ ला कार्यारंभ आदेश देण्यात आला. कार्यारंभ आदेश देऊनही जवळपास एक वर्ष होत आले तरीही काहीतरी गुड कारणाने योजनेचे काम सुरू होईना. परवा तर संबंधित योजनेचे ठेकेदार श्री.सुनील नागरगोजे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नगरपरिषदेने दाखल केला.
त्याचे आम्हाला काय करायचे. आम्हाला पाणी हवे आहे. नवीन योजनेचे काम त्वरित सुरू करा. नवीन योजना सुरू होईपर्यंत नागरिकांना सहा ते सात दिवसांनी नियमित पाणीपुरवठा करा. सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते व विद्युतीकरण करा अशा विविध मागण्याचा पाढा नागरिकांनी मुख्याधिकारी व तहसीलदार यांच्यासमोर वाचला. यावेळी मुख्याधिकारी श्री लांडगे यांनी कृती समितीच्या वरील सर्व मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र दिले. शेवगाव शहरासाठीची नवीन पाईपलाईनची निविदा प्रक्रिया त्वरित राबवून ३१ जुलै २०२४ पर्यंत कार्यारंभ आदेश देऊ असे लेखी दिले. तसेच शेवगावतील नागरिकांना सहा ते सात दिवसाचे अंतराने पाणीपुरवठा करण्यात येईल व शेवगाव शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाकरिता डी.पी.आर. तयार केला असून तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रस्ता गटारीकरीता २ कोटी ९७ लक्ष, अंतर्गत रस्ते, भुयारी गटार व विद्युतीकरणासाठी ४ कोटी ४० लाख, अंतर्गत रस्ते, भुयारी गटार व विद्युतीकरण्यासह ३४ कामासाठी ९ कोटी ८१ लक्ष, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत ९८ लक्ष ४० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्याची कामे आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच सुरू होतील असेही यावेळी लांडगे यांनी सांगितले.शेवगाव नागरिक कृती समितीच्या मागण्या मान्य झाल्याने मुख्याधिकारी लांडगे व तहसीलदार सांगडे यांचे कृती समितीने आभार मानले व आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सौ.हर्षदा काकडे, अॅड. शिवाजीराव काकडे व कृती समितीच्या सदस्यांनी शहरात जवळपास ५० हून अधिक बैठका घेऊन जनजागृती केली त्यामुळे हजारो नागरिक आंदोलनास उपस्थित राहिले. या आंदोलनास शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा देऊन आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे आंदोलन शांततेच्या मार्गाने यशस्वी झाले. या आंदोलनामध्ये हजारो महिला पुरुष युवक उपस्थित होते.
*ताजा कलम*
आजपर्यंत हर्षदा काकडे यांनी जे जे आंदोलने केली ती यशस्वी करून दाखवली. हे आंदोलन देखील यशस्वी करून दाखवले त्याबद्दल शेवगाव शहरातील नागरिकांणी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जनशक्ती मंच च्या वतीने आभार व्यक्त केले
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*