
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे नागपूर ट्रक असोशिएशनला आश्वासन
प्रतिनिधी नागपूर
नागपूर, ता. 30 : नागपुरात ट्रक पार्किंगसाठी कायम व्यवस्थेसाठी नवे ट्रांसपोर्टनगर होणार असून तोपर्यंत अस्थायी व्यवस्था त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.
नागपूर ट्रक असोशिएशनच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री डॉ. राऊत यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. सध्या नागपुरात ट्रक पार्किंगची व्यवस्था नसल्याने दिवसा केवळ दुपारी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी आहे. यामुळे ट्रक चालकांना त्रास होत असल्याचे नागपूर ट्रक असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात संपूर्ण दिवसभर ट्रकच्या रहदारीला परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, ट्रक पार्किंगसाठी कायम व्यवस्था होईपर्यंत अस्थायी व्यवस्था करण्यासाठी जागा सुचवावी, या जागेवर अस्थायी स्वरुपाची व्यवस्था करण्यात येईल.
कायम स्वरुपाच्या नवीन ट्रांसपोर्ट नगरसाठी सुद्धा सूचना कराव्या, यात लॉजीस्टिक, इतर नागरी सुविधा, दवाखाना व ट्रक चालकांच्या सोई सुविधा लक्षात घेऊन जागा सूचवावी, यासाठी देशात ट्रक पार्किंग असलेल्या शहरांची माहिती घ्यावी, असेही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सुचविले. यावेळी कुक्कू मारवाह, मलकियत सिंग, जसमित सिंग भाटीया, कंवलजीत चौहान, पप्पू गोत्रा, टोनी जग्गी उपस्थित होते.