प्रतिनिधी / नागपूर
नागपूर : – एका १७ वर्षीय बलात्कार पीडित युवतीने नागपुरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित युवती ही ११ व्या वर्गात शिकत होती. विकास बुजाडे नावाच्या तिच्या नातेवाईकने फूस लावून तिची फसवणूक करून बंगळुरूला घेऊन गेला. लग्नाचे आमिष दाखवून बंगळुरूला एकत्र राहत होते. यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
मुलगी बेपत्ता असल्याने आई-वडिलांनी नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशन गाठुन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोधा शोध केली असता पीडित मुलगी बंगळुरूला विकासच्या तावडीत असल्याचे पुढे आले. त्यांनतर पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली आणि विकास बुजाडे याच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करत अटक केली. तीन दिवसा आधी विकास हा जामिनावर सुटला त्यांनतर त्याने पीडित मुलीशी संपर्क साधून तू माझी फसवणूक केली मी तुला सोडणार नसल्याची धमकी दिली.
आपल्यावर अत्याचार करून देखील विकास आपल्याला धमकी देतो आणि बाहेर मोकाट फिरत आहे. याचा त्या पीडित तरुणीच्या मनावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे घरी कोणी नसतांना तिने गळफास घेऊन आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. पीडित मुलीच्या कुटुंबात आई-वडील आणि लहान भाऊ आहे. नागपुरच्या या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्या आहे.