
“असहाय्य नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन”
नागपूर दि. 17 :- कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिला व अनाथ बालकांना विशेष सहाय्य योजनेतून अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यातील जवळपास चारशे सेतू केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.कोरोना संकटात गरीब कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले. अनेक घरातील कर्ते पुरुष या आजारात बळी पडले, अशा कुटुंबांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांना सभेमध्ये मंजुरी देऊन लाभ सुरू करण्यात आला आहे. तरीदेखील जिल्ह्यामध्ये काही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा लोकांनी स्वताहून आपल्या नजीकच्या महाऑनलाईन केंद्रात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात अर्जासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर विशेष सहाय्य योजनेतून त्यांना आर्थिक लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील 14 तहसील कार्यालयामध्ये व सेतू केंद्र या ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा आहे, नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.