
नागपूर ता. २० :- कोरोनाच्या संक्रमणाची साखळी खंडीत करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात येत आहे. याच श्रृंखंलेमध्ये आता महिलांसाठी लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ.नितीन राउत यांच्या सूचनेनुसार मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी शहरातील महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. याअंतर्गत मनपाच्या १५५ केंद्रांवर महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. मनपाच्या या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होउन जास्तीत जास्त महिलांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
प्रत्येक घरातील महिला या कुटुंबाचा प्रमुख आधार आहेत. त्या सुरक्षित राहिल्यास संपूर्ण घर सुरक्षित राहू शकतो. महिलांच्या सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीने नागपूर शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी महिला लसीकरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मनपाची संपूर्ण आरोग्य सज्ज असून यामध्ये गृहिणी, शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचारी, मजूर, कामगार, घरकाम करणा-या अशा सर्व महिलांनी सहभागी होउन
आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असेही आवाहन मनपाच्या वतीने करण्यात येत आहे. नागपूर शहर आणि जिल्हयात आतापर्यंत १६,४३,५८६ महिलांचे लसीकरण झाले आहे. तसेच १८,०३,९७० पुरुषांनी लस घेतली आहे. शहर आणि जिल्हा मिळून ३४,४८,१३८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये २४,८३,७८३ नागरिकांनी प्रथम डोज आणि ९,६४,३५३ नागरिकांनी दूसरा डोज घेतला आहे.
कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानांतर्गत शहरातील मनपाच्या १५५ केंद्रांवर नियमित लसीकरण सुरू आहे. या अभियानामध्ये महिला मागे राहू नयेत. याउद्देशाने शहरामध्ये विशेष ‘महिला लसीकरण दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेध्ये प्रत्येक महिलेने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.