
नागपूर,दि. 26 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यामध्ये युवा स्वास्थ्य मिशन लसीकरण मोहीमेंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. 25 ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या काळात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सामान्यांना कोविड लसीकरणासाठी फार त्रास सहन करावा लागला.
मोठमोठया रांगेत राहूनही लसीकरण होत नव्हते. 60 वयोमर्यादेनंतरच्या व्यक्तींना पहिलांदा व नंतर 45 वयोमर्यादेनंतरच्या व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. सोबतच महिलांचे लसीकरण करण्यात आले. आता 18 वर्ष वयोगटातील मुलांमुलींकरीता लसीकरण होत असून या सप्ताहात महाविद्यालयातच आरोग्य विभागाचे पथक विद्यार्थ्यांचे लसीकरण करीत आहे. विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा मोठया संख्येने लाभ घेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उच्च शिक्षण विभागाचे 68 व तांत्रिक शिक्षण विभागाचे 171 असे एकूण 330 महाविद्यालयांमध्ये आरोग्य विभाग उच्च शिक्षण विभाग तांत्रिक शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून सदर मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला पहिला व दुसरा डोस विद्यार्थ्याला दिला जात आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत एकूण 16 महाविद्यालयांमध्ये 812 विद्यार्थ्यांना आतापर्यंत ही लस देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी उद्यापासून जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील 229 महाविद्यालयात हे लसीकरण होणार आहे. या सप्ताहात सर्व महाविद्यालयात लसीकरण होणार असून विद्यार्थ्यांनी व प्राद्यापकांनी या लसीकरण मोहिमेत स्वयंप्ररणेने लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करुन घ्यावे. पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.