
नागपूर दि. 26 : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या दिनांकावर रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी केले आहे.1नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत. तसेच दिनांक 13, 14 व 27, 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत असून सर्व मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ उपस्थित राहणार आहेत.
त्याच ठिकाणी नागरिकांना अर्ज बीएलओ यांचेकडे सादर करता येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चा फार्म भरावा. त्यासाठी वयाचा दाखला, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे गुणपत्रक, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, आधारकार्ड यापैकी एक रहिवासी दाखला रेशनकार्ड, भाडे करारनामा, पाणी, विज, दूरध्वनी देयक यापैकी एक ओळखपत्र आकाराचे 3 रंगीत फोटो आवश्यक आहे.
मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना 7 फार्म भरावा. मयताचे नाव कमी करावयाचे असल्यास मृत्यूचा दाखला, विवाह झाल्याने नाव कमी करायचे असल्यास लग्नपत्रिका अथवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, स्थलांतरीत झाल्यास पासपोर्ट, ड्रायव्हिंग परवाना, बँक पासबुक, रेशनकार्ड, भाडे करारनामा, ही कागदपत्रे पाणी, वीज दूरध्वनी देयक यापैकी एक आवश्यक आहे.
मतदार यादीतील दुरूस्तीसाठी नमुना 8 चा फार्म भरावा. त्यासाठी आवश्यक असलेले नावे दुरूस्त करायचा आहेत त्याबाबतचा पुरावा, वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, बँक पासबुक, रेशनकार्ड, भाडे करारनामा, ही कागदपत्रे पाणी, वीज दूरध्वनी देयक यापैकी एक आवश्यक आहे.
मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना 8 अ चा फार्म भरावा. त्यासाठी रहिवासी पुरावा पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, बँक पासबुक, रेशनकार्ड, भाडे करारनामा, ही कागदपत्रे पाणी, वीज दुरध्वनी देयक यापैकी एक आवश्यक आहे. मतदार नोंदणीसाठी 6, 7, 8 व 8-अ फार्म भरुन मतदार केंद्रस्तरीय अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात जमा करावे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी एनव्हीएसपी किंवा व्होटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.