Breaking News

जिल्ह्यात 15 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम

ग्रामीण भागाकरिता 140 तर शहरी भागाकरिता 18 पथकांची नेमणूक

सद्यस्थितीत जिल्ह्यात 1644 क्षयरुग्णांवर उपचार सुरू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दि. 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या धोरणानुसार सन 2030 पर्यंत जगभरातून क्षयरोगाचे उच्चाटन करणे अपेक्षित आहे. भारत सरकारच्या महत्वकांक्षी धोरणानुसार हे उद्दिष्ट सन 2025 पर्यंत साध्य करावयाचे आहे त्यादृष्टीने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश युद्धपातळीवर काम करीत आहे.

क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी या रोगाच्या जिवाणूंची संसर्ग साखळी खंडित होणे आवश्यक आहे. व ते साध्य करण्यासाठी सद्यस्थितीत संसर्ग झालेला प्रत्येक क्षयरुग्ण निदान व औषधोपचाराखाली आणणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाकडून यासाठी निरंतर प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात दि. 15 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

क्षयरोगाच्या रोग शास्त्रीय अभ्यासानुसार संपूर्ण लोकसंख्येपैकी 10 ते 14 टक्के लोकसंख्या या रोगासाठी जोखीमग्रस्त असते. यामध्ये जास्त घनता असलेल्या झोपडपट्ट्या, कारागृहे, हॉटेल मधील रहिवासी कामगार, आश्रमशाळा, सतत आजारी असलेल्या व्यक्ती, बांधकाम व इतर असंघटित कामगार, इत्यादी समुदायांचा समावेश आहे. त्यानुसार सदर मोहीम जिल्ह्यातील सर्व जोखीमग्रस्त भागामध्ये राबवायची आहे. सध्या जिल्ह्यात 1644 क्षय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ही आहेत अभियानाची उद्दिष्टे:

समाजातील क्षयरुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना औषधोपचारावर आणणे, संसर्गाची साखळी खंडित करून रोगाचा होणारा प्रसार रोखणे, समाजामध्ये क्षयरोगाबाबत व्यापक जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानासाठी जिल्ह्यातील निवडण्यात आलेली एकूण लोकसंख्या 3,16,451 असून ग्रामीण लोकसंख्या 2,80,906 तर शहरी लोकसंख्या 35,443 असून एकूण 10 दिवसांच्या सर्वेक्षणाचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यासाठी ग्रामीण भाग व शहरी भागातील सर्वेक्षण आशा व सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी यांच्या पथकामार्फत केले जाणार आहे. ग्रामीण भागाकरिता 140 पथक व शहरी भागाकरिता 18 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

हि लक्षणे आढळून आल्यास संशयित क्षयरुग्ण म्हणून होणार नोंद:

दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे तसेच मानेवरील गाठ.

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मोफत थुंकी नमुना तपासणी, क्ष-किरण तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे सीबीनेट मशीन तर ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बाबुपेठ येथे टृन्यॅट मशीन उपलब्ध आहे. याद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांची क्षयरोग आजाराची शारीरिक तपासणी करून क्षयरोगाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची थुंकी व क्ष-किरण तपासणी करण्यात येणार आहे. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑटो रिक्षा चालकांची नेत्र तपासणी व चष्म्यांचे वितरण

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 06: प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सामान्य …

तालुक्यातील विविध समस्यांबाबत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना राळेगावच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात , नाईलाजास्तव संघर्षास सज्ज जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-“नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved