
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाडसी निर्णय व बधितांना दिलासा
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्पातील एल्फिन्स्टन रेल्वे मार्गावरील ओलांडणी पूलाच्या बांधकामाने बाधित झालेल्या ‘जी’आणि ‘एफ’ साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनर्वसन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शिवडी-वरळी उन्नतमार्ग प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, महानगर आयुक्त एस.व्हि.आर.श्रीनिवास, माजी आमदार किरण पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पबाधितांचे शिरोडकर मंडई पुनर्विकास प्रकल्पात उत्तमरित्या आणि वेळेत पुनर्वसन करण्यात यावे, व्यावसायिक गाळेधारकांसह जास्तीत-जास्त प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईल, अशा रितीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
या उन्नत मार्ग प्रकल्पातील जी साऊथ विभागातील बाधित कुटुंबांची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून भेट घेतली होती. त्यातील सुमारे तीनशे कुटुंबांना एमएमआरडीएने घरांच्या चाव्या दिल्याची माहिती आमदार श्री. सरवणकर यांनी दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.