
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
पळसगांव (पि):-पाेहण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा खाेल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना चिमूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गडीतलाव येथे मंगळवार (दि.१९) सकाळच्या सुमारास घडली.
प्रज्वल रामभाऊ चौधरी (२२, रा. पळसगाव ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा प्रितम डोमा शिवरकर (वय २२),पियुष रतन शिवरकर (वय १२),नितेश पुंडलिक गायकवाड (२०) या तीन मित्रांसाेबत पिपर्डा वन हद्दीतील शेती परिसरातील गडीतलाव येथे फिरण्यासाठी आले हाेते. त्यांनी गडीतलाव येथे तलावात पाेहायाचा बेत बनविला .त्यांनी पोहायला सुरुवात केली मात्र पाणी कमी असल्याने त्यांनी पाचशे मिटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या टोकावर जात पोहायला सुरवात केली. अशात प्रज्वल ला तलावात पाेहण्याचा माेह झाल्याने ताे खोल तलावात उतरला. मात्र, खाेल पाण्यात गेल्याने ताे गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले.मात्र त्यात त्यांना अपयश आले.
घटनेची माहिती मिळताच पळसगांव वनविभाग वनपरिक्षेत्रचे वनपाल विनोद किलनाके, वनरक्षक ठाकरे,वनरक्षक दांडेकर यांच्या सह चिमूर पाेलीस चाैकीचे पाेलीस उपनिरीक्षक भीषमराज सोरते, मेजर गेडाम पो प्रवीण गोनाडे, रोशन तांमशट्टीवार घटनास्थळी पाेहाेचले. दुपारी प्रज्वलचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. चिमूर पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून,पुढील तपास सुरू आहे.