अंबादास दानवे विरोधी पक्षनेता विधान परिषद यांच्या कडे गावकऱ्यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
ब्रह्मपुरी:-लाडज गाव वैनगंगा नदी काठावर वसलेले आहे. गावाला वैनगंगा नदीने चारही बाजुने वेढलेले आहे, त्यामुळे लाडज या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वैनगंगा नदीला दरवर्षी पुर येत असल्यामुळे येथील नागरिकांना या पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुर सदृश्य परिस्थितीत उद्भवत असलेल्या या गावातील लोक नदी पात्रातून नावे द्वारे जीव मुठीत घेवून आवागमन करीत आहेत. पुर सदृश्य परिस्थितीत उद्भवल्यामुळे दरवर्षी जीवीत हाणी होत असते.
सन २००४-०५, २०१५-१६ या कालखंडात अनेकदा नाव बुडुन जिवीत हाणी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सदर गावात आरोग्य केंद्राची सोय नाही. प्राथमिक शिक्षणा शिवाय, माध्यमिक वा उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय नाही. यासारख्या इतर नागरी सुविधांचा अभाव आहे. सन १९८० मध्ये लाडज या गावचे स्थलांतरण गडचिरोली जिल्हयात देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर येथे करण्यात आले, परंतु मुलभूत गरजांची पुर्तता होईल अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. परिणामी शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने उदरनिर्वाह करीता दुसरा कुठलेही साधन नाही.
दि.२९,३०,३१ ऑगस्ट व १ सप्टेबर २०२० रोजी वैनगंगा नदीला महापुर आल्यामुळे व पुराने पाणी संपुर्ण शेत शिवारात व गावात गेल्यामुळे गावासभोवतालची दरड खचली. त्यामुळे घरांना भेगा पडल्या. पावसाळयामध्ये अनेक प्रकारच्या समस्याच्या सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या समस्यामूळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे, त्यामुळे सरकारने लाडज गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी प्रा शिल्पा बोडके (उबाटा)पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख महिला आघाडी, नर्मदा बोरेकर जिल्हा संघटिका (उबाटा)चंद्रपूर, प्रा अमृत नखाते शिवसेना उपजिल्हाप्रमुख ब्रह्मपुरी यांच्या उपस्थितीत लाडज ग्रामपंचायतचे सरपंच भोजराज नंदागवळी, उपसरपंच अल्का अलोणे, ताराचंद चंडीकार ग्रा. पं. सदस्य, सुधाकर नंदागवळी, रामदास नखाते, भाग्यवान अलोने, अनिल ढवरे ग्रा. पं. सदस्य, लता नखाते ग्रा. पं. सदस्य, गीता नंदेश्वर माजी ग्रा. पं. सदस्य, यांच्यासह गावकऱ्यांच्या वतीने विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांना निवेदन देण्यात आले.