Breaking News

नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध सारे

विशेष प्रतिनिधी – अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

नगरः- जिल्ह्यात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधिकारशाही होती, त्यावेळी विखेंविरुद्ध इतर सर्व असे वातावरण नेहमीच निर्माण होत असे. निवडणूक कोणतीही असो, सहकारातील की सार्वत्रिक, असेच चित्र निर्माण असे. त्यावेळी विखे विरोधकांचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे असे. मध्यंतरी विखे कुटुंबीय शिवसेनेत गेले होते. त्यावेळीही जिल्ह्यातील राजकीय लढाया याच पद्धतीने रंगत. आताही विखे कुटुंबीय भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा विखेविरुद्ध इतर सर्व असे चित्र निर्माण झाले आहे.

फरक एवढाच आहे की यंदा विखेविरुद्ध इतर सर्वांमध्ये भाजपचे नेतेच अधिक आक्रमक झालेले आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळवण्याच्या प्रतिक्षेत असताना विखे यांना त्याचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपअंतर्गत राधाकृष्ण विखे व राम शिंदे या दोन नेत्यांमधील वाद हा ‘चहाच्या पेल्यातील वादळ’ असल्याची टिप्पणी केली होती. मात्र सध्या ते चहाच्या पेल्यातील न ठरता, वादाचे वादळ जिल्ह्यात विविध ठिकाणी घोंगावू लागल्याचे दिसते आहे.

सहकारातील दिग्गज नेते स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू, जिल्हा बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे यांच्या विरोधात शड्डू ठोकत मैदानात उडी घेतली आहे. त्याला संदर्भ आहेत ते गेल्या विधानसभा निवडणुकीतील विवेक यांच्या आई स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाचे. त्यानंतर थोरात व कोल्हे यांनी एकत्र येत गणेश सहकारी साखर कारखाना विखे यांच्या हातातून हिसकावून घेतला. त्यामुळे राहुरीतील तनपुरे कारखान्यानंतर गणेश हा दुसरा कारखाना विखे यांच्या ताब्यातून गेला आहे. गणेश कारखान्यात पूर्वी शंकरराव कोल्हे व बाळासाहेब विखे यांच्यातही वर्चस्ववादाची लढाई रंगली होती. नंतर त्यांच्यामध्ये समझौतेही घडले होते, तीच परंपरा पुढे सुरू राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपचे आमदार राम शिंदे आणि अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके या दोघांनी आगामी नगर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याची इच्छा आणि तयारी लपवून ठेवलेली नाही. सध्या नगरच्या जागेचे डॉ. सुजय विखे संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. आमदार लंके यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना आमदार शिंदे व विवेक कोल्हे सातत्याने हजेरी लावत विखेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. लंके यांनी आयोजित केलेल्या ‘महानाट्या’च्या कार्यक्रमात तर विवेक कोल्हे यांनी ‘जिल्ह्याला लागलेला कॅन्सर हटवण्यासाठी लंके यांना पुढाकार घ्यावा’, असे आवाहन केले.

विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर, गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षालाच मोठा फटका बसला. त्यावेळी पराभूत झालेल्या भाजपच्या सर्व उमेदवारांनी एकत्र येत विखे यांच्या विरोधात पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र घडले उलटेच. राधाकृष्ण विखे यांचे स्थान व महत्व अधिकच बळकट झाले. आता विखे पितापुत्रांना महाराष्ट्रातील नेत्यांचा आधार न घेता केंद्रीय नेतृत्वाला भेट मिळत आहे. भाजपमधील मराठा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत जिल्ह्यात विखेविरोधात विरोधकांचे एकत्रीकरण सुरू आहे.

अलीकडेच विखे पितापुत्रांनी भाजपचे बलाढ्य केंद्रीय नेतृत्व अमित शहा यांची घेतलेली भेट मात्र वादग्रस्त ठरली आहे. या भेटीवर आमदार शिंदे यांनी शंका उपस्थित करत ही भेट कांदा निर्यातबंदी हटवण्यासाठी होती की आणखी कशासाठी? याचे स्पष्टीकरण मागितले. कांदा निर्यातबंदी अत्यंत मर्यादित स्वरुपातच हटल्याने आणि दरम्यानच्या काळात विखे यांनी त्याच्या श्रेयाचे सत्कार स्वीकारल्याने विरोधकांना आयते कोलीतच मिळाले, त्यातून विखे यांची कोंडी झाली. भाजपमधील निष्ठावान विखे यांच्यावर आधीपासूनच नाराज आहेत. या नाराजीची विखे यांनी फारशी कधी दखल घेतली नाही. विवेक कोल्हे यांनी केलेल्या आरोपांनाही फारशी किंमत दिलेली नाही.

याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीत विखेविरोधात पराभवाची तक्रार करणारे शिवाजी कर्डिले यांचे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वर्णी लागून पूनर्वसन झाले आहे. आमदार मोनिका राजळे यांनी सध्यातरी विखे यांच्याशी जुळून घेतले आहे. प्रकृती अस्वास्थ्याने आमदार बबनराव पाचपुते या वादापासून दूर आहेत. माजी आमदार वैभव पिचड व बाळासाहेब मुरकुटे यांच्या हातातून विविध सत्तास्थाने हिसकावली गेल्याने ते विखेविरोधात फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे विखेंविरोधात भाजपअंतर्गत वादाला अन्य पक्षांकडून किती व कशी रसद मिळणार? की पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यामध्ये हस्तक्षेप करत काही तोडगा काढणार? यावरच जिल्ह्यातील आगामी काळातील निवडणुकांचे चित्र अवलंबून असणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती एका वळणावर येऊन ठेपली आहे.

*ताजा कलम*

*लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी केलेला पक्ष बदल हा वीक यांच्या पत्नी पाडणारा नाही वरवर वाटणारी एकतर्फी लढत निलेश लंके यांचा जन्म माणसात असलेला संपर्क गेल्या पाच वर्षात पिंजून काढलेला मतदार संघ हेअर कटींग सलून असो अथवा फाइव स्टार हॉटेल कोणाचा सुखाच्या प्रसंगात असो अथवा दुःखाच्या प्रसंगात श्री निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणीताई लंके सतत हजर असतात त्यामुळे अहमदनगरची लढत होणार काटे की टक्कर त्यात विखे फॅक्टर मूळ होणारा स्वपक्षीय आणि इतरांना होणारा त्रास हाच विद्यमान खासदारांची डोकेदुखी ठरणारा विषय आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved