
प्रतिनिधी नागपूर
नागपूर दि. 26 : भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असून मतदार यादी कार्यक्रमाचे अनुषंगाने 1 जानेवारी 22 रोजी वयाचे 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य होणार आहे. तसेच ज्या मतदारांना मतदार यादीतुन नाव वगळायचे आहे, मतदार यादीतील मजकूर दुरुस्त करून घ्यावयाचा आहे किेंवा एकाच मतदार संघात एका भागातून दुसऱ्या भागात नाव स्थानांतरीत कररायचे आहे, त्यांनी आपला अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र कार्यालय किंवा ऑनलाईन/ऑफलाईन डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु डॉट एनव्हीएसपी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक कागदपत्रासह सादर करावा. नमुना 6,7,8, 8अ आवश्यकतेनुसार मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे.
या कार्यक्रम अंतर्गत नवीन मतदान केंद्र तयार करणे, मतदान केंद्राच्या नावात, ठिकाणात बदल करणेही शक्य होणार आहे. तरी सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून पहावे, नाव आढळून न आल्यास नमुना क्र.6 सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावा. तसेच नवीन मतदारांनी 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण होणाऱ्या सर्व पात्र मतदारांनी मतदार नोंदणी कार्यक्रमाचे औचित्य साधून न चुकता आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन आर. विमला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघनिहाय एकूण 2 लक्ष 46 हजार 960 फोटो नसलेले मतदार असून त्यांचे फोटो जमा करणे व मतदार पत्यावर सापडत नसेल किंवा कायमस्वरूपी स्थलांतरीत असेल, मृत असेल अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. फोटो नसलेल्या मतदारांनी यादी जिल्हाधिकारी यांचे कार्यालयीन संकेतस्थळावर मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात, मतदान केंद्रावर बीएलओ यांचेकडे तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष यांचेकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सर्व मतदारांनी आगामी होत असलेल्या जिल्हा परिषद पोट निवडणूक, महानगर पालिका निवडणूक, नगर परिषद निवडणूकीमध्ये इच्छुक उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी आपले नाव मतदार यादीत तपासून पहावे ज्यांचे नाव मतदार यादीत नाही किंवा ज्यांचे नाव वगळणी करण्यात आलेले आहे. अशा मतदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज क्र. 6 एनव्हीएसपी डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावा किंवा ऑफलाईन अर्ज सादर करायचा असल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात किंवा संबंधित बीएलओ यांचेकडे सादर करावा. 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिध्द होणारी मतदार यादी आगामी नागपूर महानगर पालिका, जिल्हा परिषद पोट निवडणूकसाठी वापरण्याची शक्यता असल्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे मिनल कळसकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.