
= सावनेर येथे कोविड योध्दयांचा शानदार सत्कार =
नागपूर,दि. 13 : कोराना महामारीच्या काळात स्वतःला धोक्यात घालून सामना करणे हे चांगल्या चांगल्यांना जमले नाही. ते काम आशाताईनी बहिणीच्या मायेने केले, यासाठी काळीज लागते.आत्मियता लागते. कोरोनाग्रस्त रुग्णांना तपासणी करणे सरकारी यंत्रणा घरापर्यत पोहचविणे, दररोज शासनाला अहवाल पाठविणे आदी महत्वपूर्ण काम या काळात केले. तुटपुंजा पगारातही लोकांची सेवा कशी करावी याचा वस्तूपाठ त्यांनी घातला. या भावाने बहिणीच्या मायेने केलेल्या कार्याची नोंद घेतली आहे,असे प्रतिपादन पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले.
पंचायत समिती सावनेरच्या वतीने 600 कोविड योध्दांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटिल, महिला व बाल कल्याण सभापती उज्वला बोंढारे, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, सावनेर पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, गट विकास अधिकारी अनिल नागणे आदी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.
आशाताईमुळे या काळात सर्व यंत्रणेला लढण्याची हिंमत मिळाली व जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळाले, असे सुनिल केदार यांनी सांगितले. संविधानानुसार अधिकारी व पदाधिकारी जोपर्यत एकत्र काम करत नाही, तोपर्यत शासनाचा गाढा चालत नाही म्हणून घटनेच्या माध्यमातून काम करावे. सावनेर पंचायत समितीला पहिल्यांदाच बक्षिस मिळाले आहे.
ही आनंदाची बाब आहे. याबद्दल त्यांनी मावळते गट विकास अधिकारी अनिल नागणे यांचे अभिनंदन करुन त्यांचा सपत्नीक सत्कार केला. संभाव्य तिस-या कोरोना लाटेच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषेदेव्दारे आशावर्करची कार्यशाळा घेवून उपाययोजना, व्यवस्था, तसेच त्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करावे. आशाताईच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून जिल्हा परिषदेव्दारे त्यांच्यासाठी आरोग्याच्या योजना राबवाव्यात, असे त्यांनी सांगीतले.
कोरोना काळात झालेले आर्थिक नुकसान एकदा भरुन काढता येईल पण चार ते सहा वर्गातील लहान मुलांचे नुकसान झाले हे कधीही भरुण निघणार नाही. याबाबत राज्य मंत्रीमंडळात पाठपुरावा करण्यात येईल. ग्रामिण भागातील शिक्षणावर जास्तीत जास्त भर देण्याचे ते म्हणाले.
कोरोना महामारीत कोवीड योध्द्यांनी केलेले कार्य अतुलनीय असल्याचे सांगून रश्मी बर्वे म्हणाल्या दुस-या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आरटीपीसीआर तपासणी, आक्सीजन व बेडचा तुटवडा निर्माण झाला अशा परिस्थितीत कुटुंबाची व जीवाची पर्वा न करता आशाताईनी सेवा दिली. सलाईन गार्जेर प्रयोगशाळा ग्रामीण भागात उपलब्ध करुन द्याव्यात. त्यामुळे दोन ते तीन तासात कोरोना तपासणी होणार आहे असे त्या म्हणाल्या. आतापासून तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना करण्यास तयार राहा. मास्क, सॅनीटायझॅरचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरीक अंतर पाळा व त्रिसूत्रीचा अवलंब करा. तसेच लहान मुलांच्या लसीकरणाची सोय शासनाने लवकरात लवकर करावी, असे त्या म्हणाल्या.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे जि. प. सभापती उज्वला बोंढारे, राहुल तिवारी, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डेमो घरकुलाचे उद्घाटन श्री. केदार यांनी केले. तदनंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व मॉ जीजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात आरोग्य विभागाचे अधिकारी, आशाताई, आरोग्य सहाय्यक,शिक्षक, वाहन चालक, सफाई कामगार अशा 600 कोविड योध्दयांचा यावेळी श्री. केदार व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून सत्कार आला.तसेच महाआवास पुरस्कार तालुक्यातील 16 अधिकारी व कर्मचा-यांना प्रदान करण्यातआला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुणा शिंदे यांनी केले तर संचालन शिक्षिका मंगला लांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपसभापती प्रकाश पराते यांनी मानले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, परिसरातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.