
“जिल्ह्यातील 38 रुग्णालयांचा समावेश”
“3 लाख 37 हजार लाभार्थी कुटुंबांचा समावेश”
नागपूर, दि.14 : महात्मा जोतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 62 हजार 44 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. या एकत्रित जन आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील 38 रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये 29 खासगी व 9 शासकीय रुग्णालयांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.
महात्मा जोतिबा फुले ही महाराष्ट्र शासनाची तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्यात येत असून त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 3 लाख 37 हजार 301 लाभार्थी कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबांना प्रति वर्ष प्रति कुटुंब 5 लक्ष रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत 1 हजार 209 उपचार व 183 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना ही राज्य शासनाची योजना असून यात केसरी, पिवळे तथा अंत्योदय आणि अन्नपूर्णा रेशनकार्डधारक पात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेत प्रति कुटुंब प्रति वर्ष 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा कवच देण्यात येते. या योजनेंतर्गत 34 विशेष तज्ज्ञ सेवांतर्गत 996 उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. राज्यात महात्मा जोतिबा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 38 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. लाभार्थी कुटुंबाने एकत्रित जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.या योजनेमध्ये जिल्ह्यातील खासगी रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लता मंगेशकर हॉस्पिटल, शालीनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, एम्स, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, जामठा व धरमपेठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर ट्रीटमेंट सर्व्हिस हिंगणा रोड,
महात्मे आयबँक, डागा हॉस्पिटल यासह आशा हॉस्पिटल, बारस्कर हॉस्पिटल, एनसीएचआरआय कॅन्सर सेंटर, मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी, मोगरे चिल्ड्रेन हॉस्पिटल, सारक्षी नेत्रालय, सुरज आय इन्स्टिट्यूट, शुयर टेक हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद रिसर्च, चौधरी हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटल, लाईफलाईन मल्टिस्पेशालिटी, माहुरे मल्टिस्पेशालिटी, रिजनल मेंटल हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल
आदी 38 रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे.