– जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
नागपूर दि. 30 : बहुप्रतिक्षीत धार्मिक स्थळ, मंदीर व प्रार्थनास्थळ उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असून 7 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील कन्टेनमेंट झोन बाहेरील धार्मिक तथा पुजेची स्थळ, संबंधित धार्मिक संस्थांनी सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी जारी केले आहे. तथापि दोन डोस घेतलेल्या भाविकानांच धार्मिक स्थळावर परवानगी मिळणार आहे.
कोविड प्रोटोकॉलचे पालन करत धार्मिक संस्थांनी भाविकांना प्रवेश द्यावा. त्या ठिकाणी तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे तसेच भाविकांना धार्मिक संस्थेमार्फत तापमान तपासणी सुविधा तसेच हात स्वच्छ करण्यासाठी व धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.
धार्मिक स्थळावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. लसीकरण प्रमाणपत्र व त्या समवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक आहे. लहान मुलांचे लसीकरण सुरू न झाल्याने 18 वर्ष वयाखालील मुला-मुलींना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
हा आदेश नागपूर जिल्हा नागपूर महानगर पालिका यांचे क्षेत्र वगळून क्षेत्राकरीता पुढील आदेशापर्यंत लागु असेल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.