नागपूर दि. 29 : विदर्भात 7 डिसेंबर पासून होणाऱ्या नागपूर अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पदुम, वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाने पूर्व तयारीसाठी घेतलेल्या आघाडीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कोरोना सावटामध्ये नागपूर येथे 7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन प्रस्तावित आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील तयारी सुरू केली आहे. यापूर्वी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑक्टोबरला बैठक झाली होती. त्यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यानंतर आज राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर., अतिरिक्त आयुक्त संजय ढिवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकार, यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
अधिवेशनासंदर्भात अधिकृत घोषणा मुंबई येथे होणार आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या कामकाजाची वस्तुस्थिती त्यांनी जाणून घेतली. विधान भवन, विधान भवनाबाहेर परिसर, आमदार निवास, रविभवन, 160 खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार निवास या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, दूरध्वनी व्यवस्था, वाहन व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा, अहोरात्र वैद्यकीय सुविधा, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दलाची उपलब्धता, विनाअडथळा इंटरनेट, वाय-फाय सुविधा, रेल्वे आरक्षण, खानपान व्यवस्था, अन्नपदार्थ व पेय यांची तपासणी ,उत्तम स्वच्छता या संदर्भात त्यांनी आढावा घेतला. सर्व प्राथमिक तयारी सुरू ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केली. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर. यांनी प्रशासनामार्फत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली.