तालुक्यात पाण्याचा नाही तर वाहतो दारूचा महापुर
तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याची वाढ झाली असून याचा परिणाम तेथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. खुले आम चालणारी अवैध दारू विक्री, मटका याने संपूर्ण तालुका ग्रस्त झालेला दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणचे धंदे हे तेथील काही तानाशाही करणाऱ्या लोकांची, संबंधित प्रशासनातील काही शुक्राचार्य तर काही राजकीय पुढारी यांच्या सहकार्याने चालतात असे नागरिकांकडून बोलले जात आहे. तालुक्यात अवैध धंद्याचे उच्चाटन झाल्यामुळे महिना काठी लाखो रुपयाची माया प्राप्त होत असल्याने या प्रकाराकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
असे आरोप सुद्धा तालुक्यातील नागरिकांकडून केले जात आहे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या धंद्यात कमी गुंतवणूक जास्त नफा कमविण्याच्या मानसिकतेत असलेले तरुण दिसून येत आहेत त्यामुळे तरुण पिढी या धंद्यांकडे ओढली जात आहे. अवैध धंद्याची अशीच वाढ होत राहिली तर राळेगाव तालुका अवैध धंद्याचे माहेर घर म्हणून ओळखले जाईल. धानोरा, आष्टोना, वडकी, वाढोणा बाजार, यासारख्या ठिकाणी दारूचे, मटक्यांचे खुलेआम तसेच काही छुप्या पद्धतीनेहि धंदे सुरु असतात. तसेच जळका, वरणा, गोपाल नगर, येथे मोठ्या प्रमाणात मोहाची दारू काढून विक्री केल्या जाते, बंद च्या दिवशी येथून मोहाची दारू शहरात आणली जाते.
या ठिकाणी धाडी घालून दारू काढण्याचे साहित्य नष्ठ करून दारू साठे जप्त करण्यात यावि अशी गावकऱ्यात चर्चा होत आहे. हे धंदे नागरिकांना दिसत असून पोलीसांना कशी दिसत नाही बर?? असा सुद्धा प्रश्न नागरिकांना पडत आहे. दिवसेंदिवस यांना कुठलाच धाक नसून आम्ही महिन्याला आर्थिक सहाय्य करीत असतो त्यामुळे आमचे कोणीच काही करू शकत नाही अशी या अवैध धंदे वाल्यांकडूनच चर्चा होत आहे. राळेगाव शहरातील स्टेट बँक रोड वरती चाखण्याची दुकाने थाटून दारुड्यांची पूर्ण सोय केल्या जाते त्यामुळे दारू पिणारे इथेच पिऊन पडून राहतात, अश्लील शिवीगाळ करतात, रोड वरच गर्दी करीत असल्याने बँक कडे जाणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या परिसरात नशेडी लोक नेहमीच रस्त्याने रेंगाळताना दिसतात. याच मुख्य रस्त्याने बँकेतून काढलेली रोकड घेऊन जाणाऱ्या सामान्य पुरुष व महिलांना सुद्धा धाक असतो. या रस्त्याने चोरी किंवा लुटमारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर अश्या पद्धतीची घटना घडल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल शहरातील नागरिकांनी केला आहे. गुजरी सारख्या तंटामुक्त असलेल्या गावात काही दिवसापासून अवैध देशी दारू विक्री केली जात आहे असे तेथील नागरिकांकडून बोलले जात आहे ही दारू राळेगाव शहरातून येत असल्याचे सुद्धा सांगितले जाते. राळेगाव तालुक्यातील पोलीस प्रशासन अवैध धंदे वाल्यांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होईल का?? असा प्रश्न जनतेला पडला असून यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.