19 डिसेंबरपासून 5 दिवस जिल्हा कृषी महोत्सव – ग्राहकांनो,संधीचा लाभ घ्या
विशेष प्रतिनिधी-नागपूर
नागपूर,दि.16 :– महानगरातील शेतकरी प्रेमी जनतेने आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात निर्माण केलेल्या कृषी मालाच्या विक्रीसाठी आयोजित जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत धान्य महोत्सवाला प्रतिसाद द्यावा. 19 ते 23 डिसेंबर कालवधीत चालणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील मेळाव्याला भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या महोत्सवाचे उदघाटन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असून मान्य्वर लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रकल्प संचालक अर्चना कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसंचालक श्रीमती तलमले व अरविंद उपरीकर उपस्थित होते.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनस यंत्रणा(आत्मा) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री संकल्पना अंमलात आणून जिल्हा कृषी महोत्साचे आयोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पिकलेला शेतमाल अत्यंत कमी किंमतीत मध्यस्थ व व्यापाऱ्यांना विकावा लागतो व प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहेचेपर्यंत मालाचे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, ग्राहकांना तोच कृषी माल जास्त किंमतीत विकत घ्यावा लागतो. विपणनस व्यवस्थेतील विसंगती दूर करण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
महोत्सव पाच दिवसाचा असून सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. 19 डिसेंबरला महोत्सवाचे उद्घाटन व उपस्थितांचे मार्गदर्शन, 20 नोव्हेंबरला खरेदीदार व विक्रेते संमेलन, 21 डिसेंबरला शेतकरी उत्पादक गट व कंपनी यांची क्षमता बांधणी व व्यवस्थापन यावर परिसंवाद, 22 डिसेंबरला रेशीम उद्योग कार्यशाळा तर 23 डिसेंबरला शेतकरी सन्मान समारंभ व समारोप होणार आहे.
या महोत्सवामध्ये एकूण 200 दालनांचा समावेश असून यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून उत्पादित झालेल्या कृषी माल ,धान्य, फळे, भाजीपाला, प्रक्रिया केलेले पदार्थ, सेंद्रिय कृषी माल, दुग्धजन्य पदार्थ आदी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याचबरोबर विविध कृषी निविष्टांचे दालनांचे माध्यमातून शेतक-यांना कृषी निविष्ठा, अवजारे,, कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती तथा खरेदी विक्री करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. या दालनात विविध प्रात्यक्षिके, कृषी विद्यापीठे, कृषी व कृषी संलग्न विभाग, विविध कृषी महामंडळे, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मत्स्य विकास विभाग, रेशीम विभाग, विविध कृषी महामंडळे, खादी ग्रामोद्योग आदीचे स्टॉलचा समावेश करण्यात आलेला आहे.