*सत्तरीतले तरूण-चैनुभाऊ*
*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत*
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई:-आज १६ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार आणि वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष चैनसुख मदनलाल संचेती उपाख्य चैनुभाऊ हे हे वयाची ७० वर्षे पूर्ण करून ७१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन. माझा आणि चैनूभाऊंचा परिचय महाविद्यालयीन जीवनातला, आम्ही दोघेही विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होतो. मात्र शिक्षण संपल्यावर दोघेही आपापल्या व्यवसायात व्यस्त झालो. परिणामी संपर्क तुटला होता. या काळात चैनुभाऊ व्यवसायासोबत राजकारणातही सक्रिय झाले होते. त्यांच्याबद्दल अधून मधून माध्यमातून बातम्या कळायच्या आणि आपला एक स्नेही मोठा होतोय याचा आनंद आणि अभिमान वाटायचा.
१९९४-९५च्या दरम्यान माझा पुन्हा संचेती परिवाराशी संबंध आला. योगायोगाने त्यावेळी अकस्मात आलेल्या संकटांमुळे मी देखील रिकामाच होतो. चैनुभाऊंनी १९९५ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत मलकापूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मागितली होती. त्यावेळी तिथल्या राजकारणामुळे अन्यायकारकरित्या त्यांना उमेदवारी नाकारली गेली. त्यावेळी सर्व भाजप कार्यकर्ते त्यांच्यासोबत उभे होते. कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळे चैनुभाऊंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी निवडणुकीची प्रसिद्धी यंत्रणा सांभाळण्यासाठी मी मलकापूरात ठाण मांडून बसलो होतो.
चैनुभाऊंना असलेले व्यापक जन समर्थन आणि झालेला प्रचार यामुळे चैनुभाऊ जवळजवळ १२००० मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर त्यांनी मला त्यांची प्रसिद्धी आणि विधानसभेचे कामकाज सांभाळण्यासाठी सोबत घेतले. तेव्हापासून आमचे संबंध अधिकच दृढ झालेत. त्यांनी किंवा त्यांच्या परिवाराने कधीच माझ्याशी नोकर मालक असे संबंध न ठेवता एक पारिवारिक मित्र अशाच पद्धतीने मला मान दिला. जवळजवळ सहा वर्ष मी त्यांच्यासोबत काम केले. त्यात त्यांच्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मला बघायला मिळाले.
चैनुभाऊंवर लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले होते. त्यांचे वडील आणि काका हे दोघेही संघाचे कट्टर स्वयंसेवक होते. दररोज संघात जाणारे चैनुभाऊ हे बॉडी बिल्डरही होते. त्या काळात गोपीनाथजी मुंडे, नितीनजी गडकरी, अरुण भाऊ अडसड असे त्यांचे भाजपचे सहकारी त्यांना पहिलवान म्हणूनच बोलावायचे. १९९२ किंवा ९३ मध्ये भारतीय जनता पक्षाने दिल्लीत जंतर-मंतरवर राममंदिरासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यात चैनुभाऊ सहभागी झाले होते. भाजपचे त्या वेळचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. आंदोलन उग्र झालेले बघून पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे जोरदार फवारे सोडले. अचानक तोंडावर फवारा आल्यामुळे लाल कृष्णजी अडवाणी यांना एकदम भोवळ आली. ते खाली पडणार असे बघताच चैनसुखजी गर्दीतून त्यांच्याकडे धावले आणि पूर्ण ताकदीने त्यांना उचलून घेतले. त्यांच्या या कृत्याची दखल त्यावेळच्या सर्व राष्ट्रीय दैनिकांनी घेतली होती.
१९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवून त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल त्यांना पक्षातून निष्कासित केले. त्यावेळी इतर सर्व पक्ष त्यांच्या मागे होते. ते शिवसेनेत आले तर त्यांना लगेच मंत्रीपद दिले जाईल असेही निरोप पाठवण्यात आले होते. मात्र चैनुभाऊ भाजपशीच एकनिष्ठ राहिले. त्या काळात त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात समांतर भाजप संघटित करून कार्यकर्त्यांचे मिळावे घेतले. त्यावेळच्या भाजप जिल्हाध्यक्षांनी चैनुभाऊंनी भाजपचे झेंडे वापरले म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई करण्याची मागणीही केली होती. मात्र चैनुभाऊ घाबरले नाहीत. मी भाजपचाच आहे आणि भाजपचाच राहणार असे सांगत त्यांचे काम सुरू राहिले. त्यांची पक्षनिष्ठा बघून १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने त्यांचे निष्कासन रद्द केले. एकनिष्ठ कार्यकर्ता कसा असावा याचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला होता. मलकापूर मधून आमदार म्हणून ते पाच वेळा विजयी झाले. याला कारण त्यांचा व्यापक जनसंपर्क आणि सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागणे, लोकांना अडीअडचणीत मदत करणे हेच होते. त्यांच्या प्रेम आणि आपुलकीचा अनुभव मी देखील अनेकदा घेतला.
२००१ नंतर माझ्या वृद्ध आई-वडिलांच्या प्रकृतीच्या कारणामुळे मी त्यांचे काम करणे बंद केले. मात्र नंतरच्या बावीस वर्षातही त्यांचे माझे संबंध तसेच प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत. आजही त्यांना गरज लागली किंवा काही बोलावेसे वाटले तर रात्री उशीरा देखील ते फोन करतात, किंवा नागपुरात आल्यावर सकाळीच विमानतळावरून सरळ माझ्या घरी धडकतात.त्यावेळी आमदार किंवा नेत्याची वस्त्र बाजूला ठेवून एक कौटुंबिक मित्र म्हणून ते आलेले असतात.असे माझे सुहृद आणि अनेकांचे मित्र असलेले चैनुभाऊ आज सत्तर वर्षांचे झाले आहेत. सत्तरी गाठली तरी त्यांचा उत्साह आणि तडफ ही पंचविशेतल्या तरुणाचीच आहे. त्यांचा हा उत्साह आणि तडफ अशीच कायम राहावी आणि परमेश्वराने त्यांना लोकसेवा करण्यासाठी दीर्घायुरारोग्य द्यावे हीच त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त प्रभू चरणी प्रार्थना.