जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- शासनाची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना आणि इतरही शाळेत राबवायचे उपक्रम यामुळे शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ या उपक्रमातच जातो.त्यामुळे शिक्षक अध्यापनापासून दूर जात आहे. शासनाचे उपक्रम उदंड झाले आहेत.हे उपक्रम बंद करावे आणि शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे अशी मागणी शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे यांनी केली आहे.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मागील वर्षांपासून शासन शाळांमध्ये राबवित आहे. यावर्षी या उपक्रमाचा दुसरा टप्पा आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे शासननिर्देश आहेत.सर्व शाळांनी नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.
त्यामुळे सर्व शाळांतील मुख्याध्यापक नोंदणी करणे,त्यासाठी शाळेतील अनेक बाबींची पूर्तता करणे,स्पर्धेतील दिलेली मानके पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे,नोंदणी झाल्यावर अंतिम करणे ही सर्व जबाबदारी शिक्षकांना करावी लागत आहे.यात शिक्षकांचा बराचसा वेळ वाया जात आहे.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम ऐच्छिक ठेवण्यात यावा अशीही मागणी पत्रे यांनी केली आहे.इतरही उपक्रमांचा शाळेत होणारा भडीमार कमी करण्यात यावा,वेगवेगळ्या लिंक भरण्यासाठी मुख्याध्यापकांना सुचना देण्यात येऊ नये व शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे अशी मागणी शिक्षक भारती नागपूर विभाग अध्यक्ष भाऊराव पत्रे यांनी केली आहे.