प्रतिनिधी नागपूर
नागपूर दि. २१ : नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व शाळा तूर्तास 26 जानेवारी पर्यंत बंदच असतील. 26 जानेवारी नंतर कधी शाळा उघडायचा हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याबाबत सुचविले आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी आर विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यामध्ये सायंकाळी बैठक झाली. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती व जिल्हा टास्क फोर्सने अलीकडेच व्यक्त केली चिंता तसेच दररोज वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेता 26 जानेवारी पर्यंत सर्व शाळा बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. 26 तारखेनंतर पुन्हा आढावा घेऊन या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल असेही श्री कुंभेजकर यांनी स्पष्ट केले.