मुंबई – राम कोंडीलकर
मुंबई:-वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे. घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित ‘लोकशाही’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकर्षाने जाणवत आहे. चार दशकांहून अधिक भारताच्या सिनेसृष्टीत आपला झेंडा मानाने उंचावून फडकवत आलेली ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड’, ‘लोकशाही’ चित्रपट प्रस्तुत करत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लोकशाही’च्या दृकश्राव्य गतिशिल शीर्षक पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनामनात उत्सुकता निर्माण जागी झाली होती. १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मुख्य पोस्टरने आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेबरोबरच विलक्षण प्रश्नांची ठिणगी पेटवली आहे. पोस्टरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे विचारमग्न गंभीर अशा अवस्थेत असून समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन हात जोडून लाखोंच्या संख्येत असणाऱ्या जनतेसमोर काहीतरी आव्हान करत असल्याचे दिसत आहे. नेमके हे आव्हान काय असणार आहे? आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहे?, हे गुपित प्रेक्षकांच्या उत्सुकतेला ठळक साद घालत आहे.