Breaking News

आठवलं ते सांगितलं — डॉ. मनोहर जोशी -एक उमदा सुहृद

*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:-शिवसेना नेते मनोहरपंत जोशी यांचा माझा संपर्क साधरणपणे १९९५ च्या दरम्यान आला. त्यावेळी ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी दैनिक पुढारीचा विदर्भ प्रतिनिधी म्हणून मी विधानपरिषद कव्हर करत होतो. त्याच दरम्यान त्यांचा माझा परिचय झाला. मुख्यमंत्री म्हणून त्यांना बघताना आणि त्यांच्याशी बोलताना हा माणूस इतर राजकारण्यांपेक्षा काहीतरी वेगळा आहे असे वारंवार जाणवत होते.

कालांतराने परिचय वाढला आणि त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू लक्षात येऊ लागले. त्यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतरही आम्हा सर्व पत्रकारांशी तसाच संपर्क ठेवला होता. १९९९ नंतर ते काही काळ केंद्रात मंत्री होते. त्यावेळी नागपूरला आले की हमखास भेट होत असे. मनोहरपंत आपल्या मिश्किल शैलीत फिरक्या घेत गप्पा मारायचे. त्यांची पत्र परिषद ही एखाद्या मैफिली सारखी वाटायची.

मला आठवते २००२ मध्ये मी माझे राजकीय मित्र सुबोध मोहिते यांच्या आग्रहावरून रामटेकच्या गडावरून या नावाने एक नियतकालिक सुरू केले होते. २००२ च्या दिवाळी अंकात आम्ही त्यावेळी लोकसभा अध्यक्ष झालेले मनोहर पंत जोशी यांची मुलाखत घ्यायचे ठरवले. माझे मुंबईचे पत्रकारमित्र नारायणराव हराळीकर यांनी जोशी सरांची मुलाखत घेतली. ती मुलाखत आम्ही दिवाळी अंकात नांदवी ते लोकसभा अध्यक्षांचे निवासस्थान या शीर्षकाने प्रकाशित केली. ही मुलाखत प्रचंड गाजली होती. नंतर जोशी सर नागपूरला आले तेव्हा मी त्यांना आवर्जून भेटायला गेलो आणि त्यांना या मुलाखतीचा अंक दिला. ती मुलाखत बघून जोशी सर खूपच खुश झाले आणि मला बसवून घेत त्यांनी एकूण अंकाच्या स्थितीबाबत चौकशी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिले होते.

नंतर २००४ मध्ये आम्ही बाळासाहेब ठाकरे विशेषांक प्रकाशित केला. त्यासाठी जोशी सरांना लेख मागितला. तेव्हा त्यांनी ताबडतोब लेख पाठवला होता. अंकाचे प्रकाशन बाळासाहेबांच्या वाढदिवसाला मुंबईतच झाले होते. त्यावेळी बाळासाहेबांच्या हातात अंक देताना जोशी सरांनी आवर्जून यात माझा लेख आहे असा उल्लेखही केला होता.

काही काळाने रामटेकच्या गडावरून चे नियमित प्रकाशन बंद पडले. मात्र आम्ही दिवाळी अंक आणि विशेष अंक प्रकाशित करत होतो. नागपूरच्याच काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आम्ही २००५ मध्ये राज ठाकरे विशेषांक प्रकाशित करण्याचे ठरवले. त्याचे प्रकाशन मुंबई मनोहर जोशी सरांच्या हस्तेच झाले होते. त्या कार्यक्रमासाठी नागपुरातील विद्यार्थी सेना कार्यकर्त्यांसोबत मी स्वतः मुंबईला गेलो होतो. त्या दिवशीचे जोशी सरांचे भाषण मला आजही आठवते.

२००५ पासून मी रामटेक च्या गडावरून दिवाळी अंकासाठी कोणीतरी एखाद्या मान्यवराला अतिथी संपादक म्हणून निमंत्रित करण्याची पद्धत सुरू केली. २००६ च्या दिवाळी अंकासाठी जोशी सरांना विनंती करावी असा विचार मनात आला. तसे पत्र मी तयार केले. योगायोगाने मी मुंबईत जाणार होतोच. तिथे दादरच्या रानडे रोडवर असलेल्या जोशी सरांच्या ऑफिसशी संपर्क केला. त्यांची वेळ घेतली आणि भेटायला गेलो. त्यांना विनंती पत्र देताच त्यांनी तत्काळ माझी विनंती मान्य केली आणि संपूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिले. नंतर वेळोवेळी ते आवर्जून अंकाच्या प्रगतीची चौकशीही करत होते. त्या अंकासाठी त्यांना विशेष संपादकीय आणि परिसंवादातील लेख असे दोन्ही मागितले होते. त्यांनी योग्य वेळात ते पाठवले. मुंबईला गेलो की मी त्यांना भेटत असे. एकदा अशीच त्यांनी चौकशी केली की तू आला कसा आहेस? मी त्यांना सांगितले की अंकासाठी जाहिरातींची जुळवाजुळव करायला मी मुंबईत आलो आहे. त्यांनी लगेच विचारले की माझी कुठे पत्र हवी आहेत का? असल्यास सांग. मी पत्र देतो, तुला जाहिराती मिळणे सोयीचे होईल. मी लगेच काही नावे दिली. त्या उद्योगपतींना त्यांनी लगेचच पत्र लिहून अविनाशजींच्या अंकांना जाहिराती द्या अशी विनंती करणारी पत्रे पाठवली. तुम्ही या मंडळींना संपर्क करा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या..

हा अंक अगदी प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यावर आला असतानाच माझ्या आईचे दुःखद निधन झाले. तो धनत्रयोदशीचाच दिवस होता. त्यामुळे सहाजिकच अंक प्रकाशनाला उशीर झाला. तसे मी लगेचच सरांच्या कार्यालयाला कळवले होते. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कार्यालयातून बापू महाडिक यांचा फोन आला आणि नंतर स्वतः जोशी सर देखील माझ्याशी बोलले. त्यांनी सांगितले की अंकाला उशीर झाला तरी हरकत नाही, पण अंक प्रकाशित कर. त्यांच्या सूचनेनुसार मी अंक प्रकाशितही केला. योगायोगाने त्या अंकाला मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार वितरण समारंभ अलिबागला होता. त्या समारंभासाठी मी आधी मुंबईत पोहोचलो.

अलिबागला जाण्याआधी सरांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. कसे काय आलात म्हणून त्यांनी चौकशी केली. तेव्हा मी अंकाला पुरस्कार मिळाला असल्यामुळे तो स्वीकारण्यासाठी जातो आहे असे सांगितले. तेव्हा सरांना खूपच आनंद झाला. लगेचच कार्यालयात पुष्पगुच्छ बोलावून त्यांनी माझा सत्कारही केला. माझ्यासाठी तो आनंददायी क्षण होता.

२०१० मध्ये मी विविध वृत्तपत्रांमध्ये लिहिलेल्या वैचारिक लेखांचा संग्रह मागोवा घटितांचा या शीर्षकाने प्रकाशित होणार होता. या पुस्तकासाठी जोशी सरांनी प्रस्तावना द्यावी अशी विनंती करण्यासाठी मी त्यांना भेटलो. माझी विनंती त्यांनी तत्काळ मान्य केली. पुस्तकाची मूळ प्रत ठेवून घेत महिनाभराच्या आत अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना त्यांनी पाठवली होती. आजही सकाळी सर गेल्याची बातमी येताच मी ते पुस्तक काढून सरांची प्रस्तावना पुन्हा एकदा वाचली.

२००९ मध्ये आमचे जुने वडिलोपार्जित घर पाडून आम्ही नवे घर बांधले. त्याच्या वास्तुपूजनाची निमंत्रण पत्रिका जोशी सरांना पाठवली होती. कार्यक्रमाला ते येऊ शकणार नव्हते. तरी त्यांचे आवर्जून पत्र आले आणि वास्तुपूजनाच्या आदल्या दिवशी रात्री त्यांनी फोन करूनही शुभेच्छा दिल्या होत्या.

२०१२ नंतर माझ्या मुंबईच्या फेऱ्याही कमी झाल्या होत्या. सरांनीही राजकीय क्षेत्रात वावरणे जरा कमी केले होते. पूर्वीसारखे दादरच्या संपर्क कार्यालयात न बसता आता कोहिनूरच्या कार्यालयात बसणे सुरू केले होते, नागपूरलाही ते फारसे येत नव्हते, त्यामुळे भेटी कमी झाल्या होत्या. मात्र अधून मधून फोनवर चर्चा होत असे. २०१९ मध्ये मार्च महिन्यात नागपूरच्या सन्मित्र सभेने त्यांचे व्याख्यान ठेवले होते. हे व्याख्यान आयोजित करण्यात माझा सुद्धा वाटा होताच. त्यामुळे सरांच्या आगमनापासून मी सतत त्यांच्या संपर्कात होतो. त्यावेळी त्यांचा मुक्काम माझ्या अगदी घराजवळ असलेल्या अशोका हॉटेलमध्येच होता. मी नवीन घर बांधल्यापासून सर दरवेळी नागपूरला आले की मी त्यांना घरी भेट देण्याचा आग्रह करत असे. तसाच या भेटीतही मी त्यांना आग्रह केला. माझे घर जवळच आहे असेही त्यांना सांगितले. मात्र यावेळी नको पुढच्या वेळी नक्की असे त्यांनी आश्वासन दिले.

त्यादिवशी दुपारी त्यांचे इतर काही कार्यक्रम होते. ते आटोपून दुपारची विश्रांती घेऊन ते चार नंतर तयार होणार होते त्यामुळे मला त्यांनी साडेचार वाजता या असे सांगितले होते. त्यानुसार मी आणि माझी पत्नी सौ अनुरूपा हॉटेल अशोकावर पोहोचलो. सर तयारच होते माझ्यासोबत नागपूरच्या प्रसिद्ध संगींतज्ञ डॉक्टर तनुजा नाफडे याही होत्या. जवळजवळ दीड तास आमच्या गप्पा झाल्या. संध्याकाळी साडेसहाला व्याख्यानाचा कार्यक्रम होता. म्हणून सहा वाजता आम्ही गप्पांची मैफिल आटोपती घेतली. सर तयार होऊन खाली आले. खाली कार तयारच होती. कार मध्ये बसताना सर मला म्हणाले अविनाशजी तुम्हीही कारमध्ये चालताना.. मी त्यांना सांगितले की मी स्कूटरवर येतो आहे तेव्हा ते मिश्किलपणे पटकन म्हणाले अरे मग मी तुमच्या स्कूटरवरच डबल सीट आलो असतो. मी म्हटलं सर तुम्ही काय गंमत करता. तर तेव्हा ते म्हणाले अहो एका काळात मी मुंबईत स्कूटरच चालवत असे. त्यामुळे स्कूटरवर फिरायला मला आवडते. पुढच्या वेळी आलो की तुमच्या स्कूटरवरच तुमच्या घरी येईल. मग आम्ही सर्वच कार्यक्रम स्थळी रवाना झालो.

नंतर वर्षभरात सरही नागपूरला आले नाहीत आणि माझेही मुंबईला जाणे झाले नाही. नंतर कोरोनाचा काळ सुरू झाला.कोरोना संपल्यावर मी मुंबईला गेलो ते अगदी एक एक दिवसासाठीच. त्यामुळे सरांच्या भेटीचा योग आलाच नाही…

आणि काल रात्री मनोहर जोशी अत्यवस्थ असल्याने त्यांना हिंदूंजा रुग्णालयात दाखल केल्याचे कळले. आज सकाळी उठताच सरांचे पहाटे तीनच्या सुमारास निधन झाल्याचीच बातमी कळली. एक सुजाण संयमित राजकारणी आणि उमदा सुहृद गमावल्याचे मला मनोमन दुःख झाले.

जोशी सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…..

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved