जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भद्रावती :- भद्रावती.वरोरा विधानसभा क्षेत्र हे प्रारंभी पासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेना फुटल्यानंतर या भागात शिवसेना उबाठा गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.या मेळाव्यातील गर्दीच्या माध्यमातूनही अगदी तेच चित्र दिसून येत आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथील जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाटायला आली पाहिजे, मतदारांचीही तीच अपेक्षा आहे. त्यामुळे येथील जागा ही शिवसेनेच्या वाट्याला येण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करील अशी ग्वाही शिवसेना उबाठा गटाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख तथा आमदार भास्कर जाधव यांनी दिली. शहरातील मुरलीधर पाटील गुंडावार सभागृहात शिवसेना उबाठा गटाचा भद्रावती -वरोरा विधानसभा क्षेत्रातील मेळावा पार पडला त्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार भास्कर जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, सुरेश साखरे, जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, प्रफुल चटकी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ही मुख्यमंत्री लाडकी खुर्ची योजना असल्याची जाधव यांनी टीका केली. भद्रावती विधानसभेची जागा शिवसेना उबाठा गटालाच मिळावी ही आग्रहाची विनंती जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आपल्या भाषणातून केली. मेळाव्यापूर्वी शिवसेना उबाठा गटाच्या गांधी चौक येथील मुकेश जिवतोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते पार पडले.मेळाव्यात अनेकांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. मेळाव्याला विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.