जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिमूर नगराचा श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव २० ऑक्टोंबर २०२४ रोज रविवारला श्री.बालाजी देवस्थान चिमुरच्या पटांगणात पार पडला.व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री.दिनेशजी कठाणे प्रतिष्ठित व्यापारी,वक्ते श्री.सुनीलजी मेंढे ,तालुका कार्यवाह परागजी बोरकर, नगर कार्यवाह श्री.समीरजी माकोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.शस्त्र पूजनाने उत्सवाची सुरुवात झाली स्वयंसेवकांनी शारीरिक प्रात्यक्षिक दंड,नियुद्ध,समता,योगासने, सांघिक व्यायाम योग,सांघिक गीत,सादर केले. कधी काळी भारत देशाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता,देशावर अनेक विदेशी आक्रांतानी आक्रमण केले व या भुमीला पराभूत करत राहीले पण हिंदू समाजाचे मुळ घट्ट असल्याने परकीयांना जास्त काळ टिकु दिले नाही.
संघाची पार्श्वभूमी सांगताना हिंदू समाज वारंवार पारतंत्र्यात कसा जाते असा विचार डॉ.केशव बळीरामपंत हेडगेवार यांना आला त्यानी मार्ग काढण्याचे ठरवले व स्वातंत्र्य चिरकाल टिकवायचे असेल तर हिंदू समाजाचे संघटन केले पाहिजे या हेतूने पु. डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रोपटं लावले आणि आज ते रोपटं एक विशाल वटवृक्षात रुपांतर झालेले आपल्याला दिसत आहे.आज संघ शताब्दी कडे वाटचाल करीत असताना स्वयंसेवकांनी पंचसुत्रीचा वापर स्वतःपासून केला पाहिजे. पर्यावरण, गोसेवा, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी जागरण,नागरी शिष्टाचार या सुत्राचा वापर समाजात जाऊन केले पाहिजे असे मत विदर्भ प्रांत सह सेवा प्रमुख प्रा.सुनीलजी मेंढे यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथि. दिनेश कठाणे यांनी आपले विचार व्यक्त करताना १९४२ च्या क्रांती मध्ये संघ स्वयंसेवकांचा व चिमुर तालुक्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
संघ देश प्रेमाचे धडे देतो,संस्कार करतो चिमुर नगरातील मुलांनी सुद्धा संघांच्या शाखेत जावे असे उद्बोधनात म्हणाले. कार्यक्रमात सुभाषित, अमृतवचन, वैयक्तिक गीत झाले.प्रास्ताविक व पाहुण्यांचे परीचय नगर कार्यवाह माकोडे यांनी केले.उद्बोधन ऐकण्यासाठी नगरातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.उत्सवापुर्वी नगरातील प्रमुख मार्गानी स्वंयसेवकाचे पथसंचलन निघाले.ठिकठिकीणी उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले.