तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करीता उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा/वणी :- दिवसागणिक प्रदूषणात वाढ होत असुन त्यातल्या त्यात वेकोलिच्या मुंगोली व पैनगंगा कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.शेतमालाचे सत्यानाश होत आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी युवासेना वणी विधानसभा समन्वयक आयुष रोहिदास ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनातून केली आहे. वणी सह परिसरात मोठं मोठ्या कोळसा खाणी आहेत, तसेच वणीला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून सुद्धा नावलौकिक आहे.परिसरात अवती भवती असलेल्या मोठ मोठ्या कंपन्या,कोल वाशरी आदींमुळे परीसरात मोठे प्रदूषण पसरत असुन यामुळे येथील येजा करणाऱ्या नागरिकांवर व शेतमालांवर मात्र विपरीत परिणाम होतांना दिसत आहे.
मुंगोली, पैनगंगा, कोलगाव आदी खुल्या कोळसा खाणीतून मागील काही महिन्यांपासून कोळसा जड वाहतुकीने शिंदोला मार्गे घुग्घूस सायडिंगवर नेण्यात येत आहे.परंतु कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर धूळ साचत आहे. त्यामुळे उत्पनात घट येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे,धुळीमुळे शेतमाल कापूस वेचणीला मजूर मिळत नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची मागणी व इशारा भरपाई द्या अन्यथा आंदोलन करू
शासनाने व वेकोलि प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष देऊन शेतपिकांचे पंचनामे करावे, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आयुष ठाकरे, बबन बदखल, संजय बदखल, नीळकंठ बांदूरकर, कुंडलिक बांदूरकर, मारोती बांदूरकर, काशीनाथ महावी, रत्नाकर भोंगळे, श्रीहरी टेकाम, गोपाल मत्ते, नारायण मडावी, विठ्ठल पानघाटे, गणेश देवाळकर, रमेश देवाळकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.