पालकमंत्र्यांनी केले नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कौतुक
नागपूर,२६ जुन : जिल्हा पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेट्रो भवन येथे भेट दिली. महा मेट्रो नागपूर प्रकल्पातील विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले.
यावेळी डॉ. राऊत यांना नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सध्याच्या कामाची माहिती दिली. त्यावर त्यांचे एक विस्तृत सादरीकरणही देण्यात आले. बैठकीत संपूर्ण प्रकल्पाच्या वैशिष्ट्यां विषयीही चर्चा करण्यात आली. या सादरीकरणात वर्धा रोड येथे तयार करण्यात होत असलेल्या डबलडेकर आणि गद्दीगोदाम जवळील चौपदरी वाहतूक संरचना यासारख्या प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश होता.
या सादरीकरणात ग्रिनेस्ट मेट्रो, सौर उर्जा उत्पादन, ५-डी बीम, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, पब्लिक आउटरीच, महा मेट्रो या संकल्पनेचा समावेश होता. नागपूरच्या उप-शहरी आणि ग्रामीण भागात पसरलेल्या महा मेट्रो नागपूरचा दुसरा टप्पा या सादरीकरणातील प्रमुख मुद्द्यांपैकी एक होता. दुसर्या टप्प्याव्यतिरिक्त नागपूर शहराशी संलग्न छोटेखानी शहरे जसे वर्धा, रामटेक, भंडारा, काटोल या शहरांशी जोडणारी ब्रॉडगेज मेट्रोदेखील या सादरीकरणाचा भाग होती. यावेळी बोलताना डॉ. राऊत यांनी महा मेट्रोच्या व्यावसायिक आणि कार्यक्षम दृष्टिकोनाचे कौतुक केले. शहराच्या हिताच्या दृष्टीने अधिक नावीन्यपूर्ण आणि आधुनिक कामांची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी डॉ राऊत ह्यांनी मेट्रो भवन फिरत एकंदरीत इथे झालेल्या कार्याचा आढावा घेतला आणि येथील वैशिष्ठ्यांचा स्वतः जातीने अनुभव घेतला. मेट्रो भवन स्थित गॅलरीमध्ये शहर प्रकल्पातील वेगवेगळ्या छटा दाखवल्या जातात. गॅलरीमध्ये ५डी-बीम, महा कार्ड, नॉन-फेअर रेव्हेन्यू, कॉस्ट सेव्हिंग इनिशिएटिव्ह्ज वापरण्याची मूलभूत संकल्पना स्पष्ट केली आहे.
जिल्हा पालकमंत्र्यांनी मेट्रो भवनमध्ये विद्यार्थ्यांना आभासी शिक्षणाचा अनुभव देणारी मेट्रो भवनमधील ‘अनुभव केंद्र’ सारख्या स्थापित केलेल्या विविध सुविधा प्रत्यक्ष पाहिल्या. अनुभव केंद्र या सभागृहात तेथील मोठ्या स्क्रीनवर प्रकल्पाची सद्यस्थिती दर्शवितो. तत्सम, प्रदर्शन केंद्र महा मेट्रोच्या विविध प्रकल्प साइटचे मॉडेल्स प्रदर्शित करणारे आहे. महा मेट्रोने या अभिनव ‘अनुभव केंद्रावर’ विद्यार्थ्यांसाठी भेटीचे आयोजन करण्याचे देखील ठरवले आहे.रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी या भेटींचे आयोजन केले जाईल. अनुभव केंद्र ही एक अनोखी संकल्पना आहे जी नागपूर मेट्रो प्रकल्पाबद्दल योग्य माहिती मिळवण्यास आणि समजून घेण्यास मदत करते.
सदर बैठकीला विभागीय आयुक्त श्री संजय कुमार, जिल्हाधिकारी श्री रविंद्र ठाकरे, महा मेट्रोचे संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक आणि सिस्टम) श्री सुनील माथुर, संचालक (वित्त) श्री एस शिवमथन, कार्यकारी संचालक श्री अनिल कोकाटे आणि श्री देवेंद्र रामटेककर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.