जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – अवैध खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये आतापर्यंत एकूण ३३० प्रकरणात रुपये तीन कोटी ५८ हजार ४८० दंड वसूल करण्यात आला असून १३ व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा भरारी पथकाने एकूण २० प्रकरणात रुपये २३ लाख ६८० तर जिल्ह्यातील सर्व तालुका भरारी पथकाने एकूण ३१० प्रकरणात कार्यवाही करून रुपये २ कोटी ७७ लाख ५७ हजार ८०० दंड वसूल केला असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्ह्यात सभाव्य गौण खनिज चोरी होणाऱ्या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर व वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -१९६६ च्या कलम ४८ च्या तरतुदीअन्वये कार्यवाही करण्यात येते.
जिल्ह्यात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतूकीवर उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचे मार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. वाळू/रेती निर्गती सुधारीत धोरण, २०१८ नुसार अवैध उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधीत तहसिलदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनिधी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत तहसिलदार यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे. तालुका स्तरावर तहसिलदार, उपअधिक्षक भूमी अभिलेख, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसिलदार यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे. तसेच ग्राम पातळीवर ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी यांचा समावेश असलेली समिती गठीत केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिली आहे.