
तेव्हा मी कोरोनात होतो
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खुलासा
मुंबई/नागपूर : “कोरोनाबाधित झाल्याने ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यानच्या काळात मी रुग्णालयात उपचार घेतले आणि नंतर गृह विलगीकरणात राहिलो, ही वस्तुस्थिती आहे,” असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
“माझ्या आजरपणावरुन देखील उलटसुलट चर्चा घडवून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवला आहे. त्यामुळे खुलासा करणे मला आवश्यक झाले आहे,” असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, 5 फेब्रुवारीला मला कोरोनो झाला. तेव्हापासून 15 फेब्रुवारीपर्यंत मी नागपूर येथील अलेक्सिस रुग्णालयात दाखल होतो. १५ फेब्रुवारीला मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी जेव्हा रुग्णालयातुन गृहविलगीकरणासाठी घरी जाण्यासाठी बाहेर पडत होतो त्याच वेळेस अलेक्सिस रुग्णालयाच्या गेटवर मला पत्रकारांनी लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्या संदर्भात आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत.. असे म्हणत थांबविले. मी त्यांना सांगितले की, आता होम क्वारंटाईनसाठी मला घरी जायचे आहे आणि त्यातच मला अशक्तपणा सुध्दा असल्यामुळे मी आपणाशी बोलू शकणार नाही. पण त्यांनी आग्रह केला की, तुम्ही खूर्चीवर बसा व आम्ही तुम्हाला १०-१२ फुटावरुन प्रश्न विचारतो.
त्यानंतर रुग्णालयाच्या गेटजवळील खुर्चीवर बसुन कोरोना साथ प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करत पत्रकांरांशी अल्पवेळ वार्तालाप करुन मी गृह विलगीकरणासाठी प्रस्थान केले. त्यानंतर मी गृहविलगीकरणात होतो. मी 28 फेब्रुवारीला घराबाहेर निघालो,” असे देशमुख यांनी नमूद केले.
मात्र हा घटनाक्रम अतिरंजितपणे लोकांसमोर मांडून जनतेची दिशाभूल करण्याचा काही घटकांचा प्रयत्न आहे. या कारस्थानाला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.