एक ट्रक व दोन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुकात अवैध रेती तस्करीचा हब तयार होत असल्याचे चित्र तयार झाले असून रोज सर्रासपणे रेतीची तस्करी बेकायदेशीररित्या चोरी करीत आहे, मात्र रोज प्रकाशित होणाऱ्या बातम्यांमुळे महसूल विभाग आता ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. दिनांक 27 जानेवारीला महसूल विभागाच्या संयुक्त करवाईमध्ये एक अवैध रेती भरलेला ट्रक आणि दिनांक 26 जानेवारीला रात्री अकरा वाजता सुमारास खडसंगी परिसरात अवैध मुरमाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून चिमूर तहसील कार्यालय येथे जप्तीची कारवाई करून जमा केले.
चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेती तस्करी करतांना आतापर्यंत 3 तरुणांनी आपले जीव गमाविले असून रेती तस्करांची तस्करी सुरूच आहे, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर बेधुंद चालवित तस्करी करीत आहेत. दिनांक 27 जानेवारीला पहाटे 2 वाजताच्या सुमारास एक रेती भरलेला ट्रक एम. एच. 40 एन. 6221 चिमूर येथे येत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळताच महसूल विभागाच्या तलाठी पथकांनी सातनाल्याजवळ ट्रकला सापळा रचून पकडला असून हा ट्रक गौतम पाटील यांच्या मालकीचे असल्याची माहिती पुढे आली आहे.
सदर ट्रकला चिमूर येथे तहसील कार्यालयात जमा करून जप्तीची कारवाई करण्यात आली तसेच 26 जाने ला रात्रीला अकरा वाजता दरम्यान खडसंगी परिसरातील नवेगाव मार्गावर दोन मुरमाचे ट्रॅक्टर क्र. एम. एच. 33 ए. सी. 1635 तर दुसरा ट्रॅक्टर विना नंबरचा असून पकडण्यात महसूल विभागाला यश आले. सदर ट्रॅक्टर हे अवैध मुरमाची वाहतूक करीत असल्याचे दिसून येताच त्यांच्यावर सुद्धा जप्तीची कारवाई करीत त्यांना तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ट्रॅक्टर अमित बानकर, तोमेश नाटके यांच्या मालकीचे असल्याचे माहिती मिळाली आहे.
पुढील कारवाई चिमूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार राजमाने यांच्या मार्गदर्शनात तलाठी व संयुक्त पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली असून प्रसाद गोडघासे, उमेश पाटील, प्रितेश ठाकरे, प्रितम चिडे शुभम बलकी, स्वप्नील उमरे सर्व तलाठी महसूल विभाग यांची प्रमुख उपस्थितीत कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.