देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी करा – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
कोल्हापूर:- केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानध्ये प्रशासक नेमणे ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी असून याला भाविकांचा तीव्र विरोध आहे. प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. तरी जे विश्वस्त दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे किंबहुना देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी झाली पाहिजे. दोषींना शिक्षा होईपर्यंत हा लढा चालूच ठेवून संत बाळूमामा देवस्थानासह प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि भाविक यांनी केली. ‘सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या आज क्रांती ज्योती चौक, गारगोटी, कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन’ करण्यात आले. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात हे देवस्थान द्यावे, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्रीमती अश्विनी वरुटे यांना देण्यात आले.
या आंदोलनात बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज, मुळेमामा देवस्थान भक्त मंडळ, मुळेमामा देवस्थानचे विश्वस्त, उजळाईवाडी येथील संत बाळूमामा देवस्थानचे सदस्य, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप, यांसह विविध संघटना यांसह 150 हून अधिक भाविक सहभागी झाले होते. कृती समितीचे समन्वयक बाबासाहेब भोपळे यांनी देवस्थानात झालेला भ्रष्टाचार या संदर्भात, तसेच उभारण्यात आलेला लढा या विषयी माहिती दिली. या प्रसंगी ‘‘नाही होऊ देणार, नाही होऊ देणार बाळूमामा देवस्थानचे सरकारीकरण, नाही होऊ देणार’’, ‘‘मशिद आणि मदरसा यांच्यासाठी वक्फ बोर्ड, चर्चसाठी डायोसेशन सोसायटी, तर मग बाळूमामांच्या मंदिराचेच सरकारीकरण का?’’, ‘‘बाळूमामांच्या भक्तांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे’’, ‘‘नको शासक, नको प्रशासक, भक्तांना हवेत बाळूमामांचे प्रामाणिक सेवक !’’ यांसह देण्यात आलेल्या अन्य घोषणांनी क्रांती ज्योति चौक दणाणून गेला.