अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- शिवाला प्रसन्न करण्यासाठी होम हवन,दानधर्म व तपादी विधी करण्याचे शास्त्राने सांगितले. एकाच देवावर निष्ठा असावी.वारंवार देव बदलू नये.मनात श्रद्धाभाव असेल तर,शंकराचे ठायी ठायी अस्तित्व जाणवते. असे प्रतिपादन शिवपुराण कथाकार समाधान महाराज शर्मा यांनी केले.लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरातील खंडोबानगर मैदानावर प्रसिद्ध शिवपुराण कथाकार समाधान महाराज शर्मा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरे पुष्प गुंफताना शर्मा महाराज बोलत होते. प्रथम शिवशंभू व स्व.मारुतराव घुले पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन माजी आमदार चंद्रशेखर घुले,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले,पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितीज घुले आदींच्या हस्ते करण्यात आले.
शर्मा महाराज म्हणाले, ॐ नमः शिवाय या तारक पंचाक्षरी मंत्राचा जप तसेच भस्म लेपन व रुद्राक्ष धारण केल्यावर साधक,उपासकांचा उद्धार होतो तसेच श्रद्धा व निष्ठेने उपासना करणाऱ्या साधक,भक्तांवर निश्चित शिवाची कृपा होते.मात्र,त्यासाठी शिवलिंगाची षोडशोपचार पूजा होणे गरजेचे आहे.बिल्व वृक्षाचे महत्व विशद करताना त्यांनी या वृक्षाच्या मुळाशी सर्वतीर्थ असल्याचे स्पष्ट केले. गुरु महिमा सांगताना शर्मा महाराज म्हणाले,गुरुमुळे जीवनाचे सार्थक होत असते.क्षेत्र कोणतेही असो,मनुष्याला गुरु हा असलाच पाहिजे.
आयुष्याची शिदोरी शिष्यासाठी जो हवाली करतो तो खरा गुरु होय.भस्माची महती सांगताना ते म्हणाले,मस्तकावर त्रिपुंड लावल्यावर साधकाला निश्चित मोक्षप्राप्ती मिळते तसेच विभूती धारण करणाऱ्याच्या मस्तकावर २७ देवतांचा वास असतो.रुद्राक्ष धारण करण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी नियमादी विधीसह सांगितले.शिवमहापुराण कथेची पुष्टी करतांना ते म्हणाले,कथा सांगताना तेथे शांती असते.परिणामतः तेथे भगवंताचा वास असतो.त्यामुळे महाशिवपुराण कथा मनुष्याच्या जीवनाची व्यथा दूर करते. माजी आमदार चंद्रशेखर घुले,राजश्रीताई घुले पाटील,डॉ.क्षितिज घुले पाटील तसेच वडार,मोची,परीट,नाव्ही,सुतार,लोहार,कुंभार आदी विविध समाजातील ज्येष्ठ व निमंत्रित अतिथींच्या हस्ते महाआरती झाली. कथा सुरळीत पार पाडण्यासाठी शिव महापुराण कथा नियोजन समितीच्या सर्व पदाधिका-यांनी योग्य नियोजन केले.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*