सोशल मिडीयावर चुकीची माहिती शेअर केल्यास कारवाई
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर : – एचएमपीव्ही विषाणूबाबत सद्यस्थितीत कोणतेही काळजीचे कारण नाही हा विषाणू नवा नाही. त्यामुळे घाबरण्याचे अजीबात कारण नाही. नागपूर मध्ये संशयीत म्हणून जे रुग्ण खाजगी दवाखान्यात दाखल झाले त्यांच्या रक्ताचे नमूने तपासासाठी एम्स आणि पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. ते दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याबाबत विनाकारण जनतेच्या मनात भिती पसरविणारे वृत्त कोणीही पसरवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
नागपूर येथे दोन संशयीत रुग्णासंदर्भात समाज माध्यमांवर सुरु असलेल्या शंकांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सद्यस्थिती समोर सांगून पुर्णविराम दिला. कोणत्याही साथीच्या आजाराबाबत शासकीय यंत्रणेवर पुर्ण विश्वास ठेऊन व्यक्त व्हायला हवे. जे संशयीत होते. ते स्वत: दवाखान्यात चालत आले. बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. असे असतांन केवळ एैकीव माहितीवर जर कोणी सोशल मिडीयाद्वारे चुकीची माहिती पसरविल्यास त्यांच्या विरुध्द कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, मॉयक्रोबॉयलोजी विभाग प्रमुख डॉ. मिश्रा आदी उपस्थित होते.
एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दी सारख्या) आजारास तो कारणीभूत असतो. हा हंगामी आजार आहे. फ्ल्यु प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा आजार उद्भवतो. महाराष्ट्रात आतापर्यंत या एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा नाक आणि तोंड रुमालाने झाकून घ्या. आपले हात वारंवार साबनाने स्वच्छ धूतले पाहिजे. पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. आपली जागा अधिक हवेशिर ठेवा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधी मनाने घेऊ नका असे आवाहन आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले आहे.
00000