जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बरडघाटच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने शाळेचा सुवर्णमहोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व सत्काराचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश डांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक रावन शेरकुरे,प्रकाश कोडापे, कैलाश बोरकर,विशाल वासाडे आदी उपस्थित होते.
शाळेच्या स्थापनेच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असलेले माजी सैनिक पंढरी श्रीरामे,राजुरा येथे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक असलेले पांडुरंग श्रीरामे, गावाचे पोलीस पाटील असलेले रामचंद्र सहारे, शेषराव सहारे,माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे,वैद्यकीय व्यावसायिक डॉ.मंगेश घरत,संपूर्ण विदर्भात कराटेचे प्रशिक्षण देणारे सुधीर रिनके,आदिवासी सेवा सहकारी संस्था खडसंगीचे अध्यक्ष प्रभाकर दोडके,सरपंच असलेल्या पौर्णिमा ढोक,आशा वर्कर म्हणून कार्य करणाऱ्या कोमल शेंडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कवडू बारेकर या माजी विद्यार्थ्यांना पाहुण्यांचे हस्ते शाल, सन्मान पत्र आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आपल्या बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला.शालेय जीवनातील शिक्षकांच्या,सहपाठी विद्यार्थ्यांच्या आठवणीने माजी विद्यार्थी भावूक झाले.आपल्या जीवनात आलेल्या खडतर प्रवासाचे वर्णन करताना माजी विद्यार्थ्यांनी मेहनत, चिकाटी आणि सातत्य ठेवल्यामुळे आपल्या जीवनात यश आल्याचे स्पष्ट केले.आपल्यावर गावाचे आणि शाळेचे ऋण आहेत,गावासाठी आणि शाळेसाठी आम्ही नेहमी मदत करत राहू असा आशावाद याप्रसंगी माजी विदयार्थ्यांनी व्यक्त केला.शाळेला तारेचे कुंपण आणि गेट देणाऱ्या माजी विद्यार्थी पंढरी श्रीरामे यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.मेळाव्याचे संचालन आणि आभारप्रदर्शन युवा कार्य प्रशिक्षणार्थी हरिकृष्ण कामडी यांनी केले.मेळाव्याला माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.