माता पालकांनी आनंद मेळाव्याचा मनसोक्त लुटला आनंद
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत ५ फेब्रुवारी रोज बुधवारला माता-पालक मेळावा व ६ फेब्रुवारी रोज गुरुवारला बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती व ग्राप सदस्य सौ रमाताई वनकर ह्या होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ रिता निंबुळकर यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशाल वानखेडे, सौ मेघा खडसंग, सौ सोनू ताई पाऊंकर , सौ प्रणाली सोनटक्के, सौ वरटकर, सौ लता पवार ग्रा. प. सदस्य , सौ सरला ताई गवारकर ग्रा. प. सदस्य तसेच अंगणवाडी माजी सेविका बेबीताई इंगोले व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य हे होते. यात महिला चा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच माता पालक व विद्यार्थ्यांचे विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी येथे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे शिक्षण व कला गुण यांना वाव मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती माता पालकांच्या माध्यमातून देण्याच्या हेतूने ५ फेब्रुवारी माता पालक व६ फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम तसेच सामान्य ज्ञान परीक्षा व इतर कलागुणाबाबत या माता पालक व बालआनंद मेळावा याचे माध्यमातून शाळेचे मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर व शाळेचे इतर शिक्षक यांनी महिला पालकांसोबत विस्तृत चर्चा केली.अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना कसा वाव मिळेल याबाबत ही चर्चा झाली व त्यानंतर बालआनंद मेळाव्यात महिला पालक व विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध खेळ खेळून माता पालक मेळाव्याचा आनंद लुटला.
माता पालकांना हळदी कुंकू व तिळगुळ दिल्यानंतर सर्व माता पालकांना जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वतीने ब्लाऊज पीस देण्यात आले. कार्यक्रमानंतर आनंद मेळाव्यामध्ये महिला पालकांनी संगीत खुर्ची ,वर्तुळामध्ये चंडू टाकने, लिंबू चमचा , फुगा ग्लास व दोरीवर उड्या मारणे असे विविध खेळ खेळले तसेच माता पालकांचे गीत गायन स्पर्धा व उखाणे घेण्याचा कार्यक्रम पार पडला प्रत्येक खेळातील सहभागी विजेत्या मातांना शाळेतर्फे शिल्ड देण्यात आले. यानंतर 6 फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान मिळावे या दृष्टिकोनातून विद्यार्थ्या मार्फत विविध प्रकारचे स्टॉल लावून रुचकर पदार्थांची विक्री विद्यार्थ्या मार्फत करण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी स्वतः घरून बनवलेले पदार्थ विक्री करता ठेवण्यात आले व ते पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः विक्री करून व्यावसायिक ज्ञान प्राप्त केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानाचे महत्त्व कळले.
या बाल आनंद मेळाव्या ला जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या शिक्षक व विद्यार्थिनींनी सुद्धा भेट दिली.हा माता पालक व बाल आनंद मेळावा कार्यक्रम खूप उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा झाला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेने घेतलेल्या या माता पालक व बाल आनंद मेळावा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या माता पालक खूपच आनंदी झाल्या होत्या. असेच कार्यक्रम घेऊन विद्यार्थी व पालकात समन्वय साधण्यात यावा असे महिला पालक वर्गामधून सांगण्यात आले तसेच नियमित महिला पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम व इतर विषयावर चर्चा सत्र घेण्यात यावे असे सुद्धा माता पालक वर्गातून सुचित करण्यात आले व त्याला शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंदा कडून संमती देण्यात आली.
या महिला पालक आनंद मेळावा व पालक सभेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन उच्च प्राथमिक केंद्र शाळेचे शिक्षक प्रवीण दीडपये यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक राजकुमार शिंदे यांनी केले. या माता पालक व बाल आनंद मेळावा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुंभलकर तसेच शिक्षक प्रवीण दीडपाये ,राजेंद्र दूरबुडे,राजकुमार शिंदे, महेंद्र कौरती शाळेची स्वयंसेविका योगिता धोटे तसेच प्राथमिक कन्या शाळेच्या शिक्षिका सौ नीलिमा दाभाडे व स्वयंसेविका ऋतुजा इंगोले या शिक्षकांनी तसेच केंद्र शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.