‘विशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ
‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ :
मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद
नागपूर, ता. ८ : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. मनपातर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरणाच्या ‘विशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला गुरूवार (ता. ८) पासून प्रारंभ झाला. मोहीमेच्या पहिल्या दिवशी ‘चालक दिवसा’ला शहरातील वाहन चालकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील ऑटो रिक्शाचालक, सायकल रिक्शाचालक, ई-रिक्शाचालक, काली-पिली टॅक्सीचालक, ओला-उबेर टॅक्सीचालक व खासगी ट्रॅव्हल्स मध्ये काम करणाऱ्या आदी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. संबंधित लसीकरण मोहीम शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील सर्व शासकीय लसीकरण केंदावर राबविण्यात आली. यामुळे शहरातील सर्व वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला असून याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
विदर्भ ऑटोरिक्शा चालक संघटना कृती समितीचे अध्यक्ष विलास भालेराव म्हणाले मनपाद्वारे शहरातील चालकांसाठी राबविण्यात येत असलेली मोहीम अतिशय प्रशंसनीय आहे. सर्व ऑटोरिक्शा चालकांनी या संधीचा लाभ घेउन स्वत:ला आणि आपल्या परिवाराला सुरक्षित करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. या विशिष्ट लसीकरण मोहिमेसाठी जलाराम मंदिर ट्रस्ट व्दारे वाहन चालकांसाठी १२०० ताकांचे पॅकेट देण्याची व्यवस्था करण्यात आली. या लसीकरण मोहिमेच्या सफलतेसाठी नोडल अधिकारी श्री. मिलींद मेश्राम, उपायुक्त (महसूल) , श्री. संजय दहीकर, श्री. राजू सोनेकर, श्री. पंकज मेश्राम व श्री.प्रमोद माटे यांनी प्रयत्न केले.
मोहिम फक्त ४५ वर्षावरील वयोगटासाठी
मनपा तर्फे स्पष्ट करण्यात येत आहे की, विशिष्ट घटक, विशिष्ट दिवस, मोहिमे अंतर्गत फक्त ४५ वर्षावरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण केल्या जाईल. तसेच सामान्य नागरिकांचे सुध्दा लसीकरण केल्या जात आहे.
४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरण मोहीमेला बळ देण्यासाठी आणि प्रत्येक घटकाला लसीकरणाचा लाभ देण्यासाठी मनपातर्फे ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १२ एप्रिलला पार्सल डिलीवरी करणा-या नागरिकांचे लसीकरण होणार आहे. यामध्ये फुड डिलीवरी व पार्सल डिलीवरी करणाऱ्या सर्व नागरिकांचा समावेश असणार आहे. त्यानंतर १४ एप्रिलला भाजीपाला, फळ विकणारे आणि दूधाची डिलीवरी करणाऱ्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसेच १६ एप्रिलला कामगार आणि हॉकर्स, १८ एप्रिलला मीडिया मध्ये काम करणारे कर्मचारी व पत्रकार, २० एप्रिलला व्यापारी व मेडिकल दुकानदार, २२ एप्रिलला रेस्टारेंट व हॉटेल कर्मचारी तसेच २४ एप्रिल रोजी सेल्स व मार्केटींग चे काम करणाऱ्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. या सर्व नागरिकांनी आपल्यासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेंस सोबत आणावे. तसेच मनपाद्वारे प्रत्येक बुधवारी ४५ वर्षावरील वयोगटातील महिलांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरणाची विशेष व्यवस्था केली जाईल. या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मोठया प्रमाणात लसीकरण करणे हा आहे, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी दिली.
Check Also
पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …
मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत
बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …