Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले

 

आपल्याशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, सर्व धर्मियांना मनापासून धन्यवाद देत आहे. मला एका गोष्टीचे समाधान आहे की सगळ्यांनी एक सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून संयम पाळला, तुम्हाला खरंच धन्यवाद देतो.

३ गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, आपले आयुष्य पूर्वपदावर आणणे, त्यात सणासुदीचे दिवस व पावसाळा. मला भीती होती आणि आहेच, ती समोर दिसत आहे. कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. वाढता वाढता वाढे अशी त्याच परिस्थिती आहे. संपूर्ण जगामध्ये दुसरी लाट आली की काय असे भीतीदायक चित्र आपल्यासमोर येत आहे.

सगळेच जण आपापली जबाबदारी ओळखून, सामाजिक भान ठेऊन वागत आहेत. काही जणांना वाटत असेल की आता कोरोना संपला आहे. पुन:श्च हरी ओम म्हणजे आपलं राजकारण पुन्हा सुरू करावं. केलंही असेल, सुरु करायला काही हरकत नाही. तूर्त मी राजकारणाबद्दल काही बोलणार नाही.

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय, त्याच्याबद्दल एकदा मात्र मी जरूर मुख्यमंत्रीपदाचा मास्क थोडावेळ बाजूला ठेऊन आपल्याशी बोलणार आहे. त्यातले सुद्धा धोके आणि एकूण ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर नक्की मांडणार आहे. मी बोलत नाही आहे, याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे उत्तर नाही.

महाराष्ट्रामध्ये वाताहत झाली असं नाही. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग पूर्व विदर्भातील पुर परिस्थिती, निसर्ग चक्रीवादळ, मधल्या काळात अघोषित वादळ मुंबईत येऊन गेलं, अशा अनेक परिस्थितीत सरकार खंबीर पावले टाकत आहे, यशस्वीपणे पुढे चाललेलं आहे. हे केवळ आपल्या आशीर्वादाचेचं बळ आहे.

कोरोनाचे संकट हे आता आक्राळविक्राळ रूप धारण करेल अशी जगभर चिंता व्यक्त केली जाते. WHO या संस्थेने सांगितले आहे की कदाचित ही पुढच्या अधिक भीषण संकटाची नांदी असू शकेल. घाबरण्याचे काम नाही आहे, पण खबरदारी घेतलीच पाहिजे.

मी महाराष्ट्रामध्ये येत्या १५ तारखेपासून जवळपास महिनाभर एक मोहीम राबवत आहे. या मोहिमेमध्ये जो कोणी आपल्या महाराष्ट्रावर प्रेम करतो, महाराष्ट्राला आपली भूमि मानतो, तो प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी जात, पात, पक्ष, राजकारण बाजूला ठेऊन सहभागी व्हावा किंबहुना तसं माझं आवाहन आहे.

या मोहिमेला आपण नाव दिलं आहे, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”! हे महाराष्ट्र माझे कुटुंब आहे आणि महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी ही महाराष्ट्रातील प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीची जबाबदारी आहे.

आपण आता ऑक्सिजन ही आरोग्य खात्याची प्राथमिकता ठरवलेली आहे. त्यामध्ये ८०% ऑक्सिजन हा आरोग्यासाठी वापरला जाईल आणि मग आपण उद्योगासाठी देऊ.

अवघड वाटत असलं तरी अशक्य असं काहीच नसतं. अवघड म्हणजे काय? महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास १२ कोटी आहे. १२ कोटी जनतेची तपासणी अशक्यप्राय आणि अवघड आहे. आपला प्रयत्न असा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पुढच्या महिन्यात किमान २ वेळा तरी आरोग्याची चौकशी करायला आपली टीम जाईल.

इतर देशांनी संपूर्ण ओपन केलं पण कायदे कडक केलेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नसेल तर दंड, दुकानात गर्दी झाली तर दुकान बंद, मेट्रो व बसमध्ये गर्दी झाली तर करवाई. हे कायद्याने करण्याची गरज आहे का? आपण आपली जबाबदारी पार पाडू शकत नाही का? आपण करूच पण काही ठिकाणी हे कायदे करावे लागतील.

मला एका गोष्टीचे समाधान वाटते की या ही परिस्थितीत आपण जे वचन शेतकऱ्यांना दिले होते की ज्यांचं पीक कर्ज हे २ लाखांपर्यंत आहे, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करणार. जवळपास २९.५ लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त केलं आहे. नक्कीच अभिमान आहे.

यावर्षी विक्रमी कापूस खरेदी केली आहे. जिथे जिथे नुकसान झाले आहे, तिथे तिथे सरकार म्हणून आपली जबाबदारी आपण पार पाडत आहे. एकूणच सरकार शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोबत, त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे आहे.

पुढचे वर्ष आपल्या महाराष्ट्रातील कुपोषित, आदिवासी बालके आहेत, अशा जवळपास ६.५ लाख बालकांना आपण वर्षभर मोफत दूध भुकटी देत आहोत. त्याच बरोबर जवळपास १.२५ लाख गरोदर आणि स्तनदा माता भगिनी आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आपण दूध भुकटी मोफत देत आहोत.

आदिवासी माता, भगिनी, बांधवांसाठी खावटी अनुदान योजना जी गेले काही वर्षे बंद झाली होती, ती सुद्धा आपण चालू केली आहे. शिवभोजन आपण १० रुपयांत थाळी देत होतो, ती या काळात ५ रुपये केली आहे. जवळपास १.७५ कोटी थाळ्यांच वितरण कोरोना काळात झाले आहे आणि हे सतत चालू आहे.

जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण राज्यात सापडला, तेव्हा सगळ्या मिळून साधारणत: ७७०० रूग्णशय्या होत्या, आजच्या घडीला राज्यात नेहमीचे, ऑक्सिजन, ICU, व्हेंटिलेटर बेड धरले तर किमान ३ लाख ६० हजार बेड आपण ४-५ महिन्यात वाढवलेले आहेत.

मला असं वाटतं की अशी कोणतीही बाब आपण शिल्लक नाही ठेवली की जिथे आपण सरकार म्हणून आपलं काम केलं नाही. निसर्ग चक्रीवादळामध्ये जवळपास ₹ ७०० कोटींची मदत आपण केलेली, अजूनही चालू आहे. नुकतेच तिथे केंद्राचे पथक येऊन गेलं, संपूर्ण पाहणी केली आणि केंद्रीय पथकाने सुद्धा समाधान व्यक्त केले.

पूर्व विदर्भातसुद्धा आपण तातडीने तत्काळ मदत म्हणून ₹१८ कोटी पाठवून दिले. पण मी माझ्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त माता-भगिनी, बांधवांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका. ज्याप्रमाणे आपण कोल्हापूर व सांगली येथील जनतेला मदत केली, तशीच मदत तुमचे सरकार तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही.

“जे विकेल, ते पिकेल”, आतापर्यंत जे पिकेल ते विकेल असं होतं, ते मी आता उलटे केले. आपलं कृषी खातं जगभर,देशात, राज्यात बघेल,यावर्षी कोणत्या पिकाला बाजारपेठ आहे,कोणतं पीक कुठे विकलं जाईल, तसचं बी बियाणे शेतकऱ्याला दिलं जाईल. महाराष्ट्राची ओळख एक दर्जेदार पीक देणारं राज्य बनवायची आहे.

गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाचा विषय समोर आला आहे. खरं म्हणजे हा विषय अशा पद्धतीने येण्याची काही आवश्यकता नव्हती. महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षांनी एकमताने मराठा समाजाच्या न्यायहक्काच्या लढ्याला न्याय देण्यासाठी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला.

मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, ते आपण जिंकलो. सर्वोच्च न्यायालयातील लढाई आपण लढत आहोत. ही लढाई लढताना पहिल्या सरकारने जे वकील दिले, त्यात आपण कोणीही बदलले नाही, देशातील सर्वोत्तम वकील आपण दिले आहेत. कुठेही आपण कोर्टमध्ये अर्ग्युमेंट करायला कमी पडलो नाही.

हा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी आपल्याला कायदेशीर लढाई करायची आहेच, ती करण्यात कुठे तसूभरसुद्धा हे सरकार मागे राहणार नाही हे वचन मी परवाच दिलं आहे, आज सुद्धा देत आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतोय, सरकार आपल्यासोबत आहे, सरकारने निर्णय घेतलेला आहे.

कोरोनाच्या संकटात अधिक आंदोलन, मोर्चे कृपा करून काढू नका. त्याची आवश्यकता नाही, संपूर्णपणे सरकार हे तुमच्या भावनेशी सहमत आहे, तुम्हाला न्याय मिळवून देणं हे आमचे कर्तव्य आहे, आम्ही वचनबध्द आहोत. आपण सगळे एकत्र आहोत, एकजुटीने हा न्याय मिळवून घेतल्याशिवाय थांबायचं नाही.

महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी पुन्हा एकदा विनंती करतो आहे, की या कोरोनाच्या संकटामध्ये एक जबाबदारीचा हिस्सा आपल्याला घ्यावा लागणार आहे. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहीम अंतर्गत जी पथके येतील, त्यांना सहकार्य करा.

कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी ज्या सूचना सरकार म्हणून आम्ही आपल्याला करत आलो, त्या सूचनांचे जसे पालन आजपर्यंत केलं तसे याही पुढे तुम्ही कराल आणि या युद्धात निर्णायक विजय आपण मिळवू हा आत्मविश्वास व्यक्त करतो.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved