पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आढावा बैठक
• तूर्तास लॉकडाउन नाही; स्वयंशिस्त वाढवण्याचे आवाहन
• मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
• बेड मॅनेजमेंटसाठी आयएएस अधिकाऱ्यांनी आणखी सक्रिय व्हावे
• ट्रेसिंग वाढवा; मृत्यूदर कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
• मेयो व मेडिकलमध्ये वॉर रूम सुरू करण्याचे निर्देश
• ऑक्सीजन पुरवठ्यातील सुलभता व उपलब्धतेवर चर्चा
• गर्दी नियंत्रण, गृह अलगीकरणासाठी व्यापक मोहीम राबवा
• वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची सेवा घ्या
नागपूर, दि. 13 : नागपूरमधील मृत्यूदर कोणत्याही परिस्थितीत वाढता कामा नये. तसेच रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची अर्थात डब्लिंग रेट वाढावा, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दिलेले काम काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक आहे. प्रत्येकाकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली असून उद्यापासून पोलिसांनी शहरातील गर्दी नियंत्रित व शिस्तबद्ध करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे घेतलेल्या संयुक्त बैठकीत दिले.
नागपुरातील वाढत्या रुग्ण संख्येला नियंत्रित करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेसोबत प्रशासकीय अनुभव असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना बेड मॅनेजमेंट, कॉन्टक्ट ट्रेसिंग, प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यामुळे आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोना नियंत्रणाची कामे करावी, असे स्पष्ट निर्देश आज जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत दिले.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी मुंबई येथून घेतलेल्या गर्दीवर नियंत्रणाच्या व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आज सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाचारण करीत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा घेतला.
या बैठकीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, कोविड 19 च्या नोडल अधिकारी तथा वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे, मिताली सेठी, मनीषा खत्री, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त आयुक्त राम जेाशी, उपायुक्त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञ व कोविड19 नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नागपूरमध्ये खाटांची उपलब्धता नसल्याची सर्वत्र तक्रार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलची संख्या आणखी वाढवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी त्यांनी बेड मॅनेजमेंट आणि मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या सनदी अधिकाऱ्यांसोबत खाटा उपलब्धतेच्या स्थितीबद्दलची चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत या दोन्हीही सरकारी हॉस्पिटलमधून कोरोनाचा रुग्ण परत जाता कामा नये. त्यासाठी खाटांची उपलब्धता दर्शविणारा डॅशबोर्ड सर्वांसाठी तातडीने उपलब्ध करावा. दोन्ही रुग्णालयांमध्ये वॉर रूमचे गठण करावे, वेगवेगळ्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढवा, रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या हॉस्पिटलमधून कमी करा, रुग्णाबाबतची माहिती सुलभतेने मिळेल, असे नियोजन करा, अशा सूचना त्यांनी बैठकीत केल्या.
या बैठकीला ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले होते. नागपूर व विदर्भातील अन्य जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची पूर्तता सुलभ पद्धतीने होण्यातील अडचणी जाणून घेतल्या. आवश्यकतेनुसार अन्य जिल्ह्यांना थेट ऑक्सिजन मिळेल, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तथापि, नागपूरमधल्या शासकीय व खाजगी दोन्हीही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही, याची जबाबदारी देण्यात आली.
मनुष्यबळाच्या कमतरतेला लक्षात घेता नागपूर व परिसरातील शासकीय-निमशासकीय सर्व कॉलेजमधील शेवटच्या वर्षातील व शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेल्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना रुग्ण सेवेमध्ये रूजू करून घ्यावे. तसेच आशा व अंगणवाडी सेविकांसोबतच परिचारिकांना देखील आवश्यक मानधन वाढवून देण्यावर त्यांनी भर दिला.
नागरिकांमध्ये लक्षणे दिसल्याशिवाय चाचणी करायची नाही, असा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी, मास्क वापरूनच बाहेर पडावे, अनावश्यक बाहेर पडू नये, अशा पद्धतीच्या मोहिमेला व्यापक प्रसिद्धी महानगरपालिकेने राबविण्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री व गृहमंत्री यांनी रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी उद्यापासून गर्दीचे नियंत्रण व मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक व सक्त कारवाई करावी, असे निर्देश केले. 4 सप्टेंबर रोजी गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई मनपा आयुक्त आय. एस. चहल व तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने डॅशबोर्ड तयार करणे, वॉर रुम तयार करणे, दररोज आढावा घेणे अशा सूचना केल्या होत्या. या सूचनासंदर्भात आठ दिवसातील अंमलबजावणीबाबतचा आढावा यावेळी गृहमंत्र्यांनी घेतला.
उपलब्ध औषध पुरवठा, ऑक्सिजन उपलब्धता, तसेच पोलिसांसाठी व यंत्रणेत काम करणाऱ्या अन्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राखीव खाटा ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेने कोवीड योध्दांसाठी समर्पित अत्याधुनिक सोयीसुविधांसह रुग्णालय तयार करावे, ही सूचना केली. मात्र हे आरक्षण पाळताना दवाखान्यामध्ये कोणत्याही गंभीर रुग्णांची हेळसांड होता कामा नये, याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देखील त्यांनी अधिकाऱ्यांवर निश्चित केली.
यावेळी प्रशासनाची लॉकडाऊन संदर्भातील मते देखील त्यांनी जाणून घेतली. तथापि, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या समस्यांना लक्षात घेता, तूर्तास हा निर्णय घेणे योग्य नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. तथापि, यापुढे कोरोना सोबत लढताना व जगताना प्रत्येक नागरिकाला स्वयंशिस्तीने वागणे गरजेचे आहे. गरज नसताना बाहेर पडणे हे धोक्याचे असून मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, तपासणी स्वयंप्रेरणेने करून घेणे या बाबींसाठी जनजागृती वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
********