
नागपूर: नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणा-या बेघर व निराधारांना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे निवारा उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय बेघर व निराधारांची आरोग्य व नेत्र तपासणी करुन त्यांना औषधोपचारही करण्यात आला.
१० ऑक्टोम्बर, जागतिक बेघर दिनानिमित्त मनपा उपायुक्त श्री प्रकाश वराडे यांचे मार्गदर्शनात दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, नुतन मोरे यांच्या सहकार्याने बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
बेघर व निराधारांना जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाने शहरात पाच ठिकाणी बेघर निवारे सुरू केली आहे. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जागतिक बेघर दिनाच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणी बेघर व्यक्तीची शोध मोहीम राबवून त्यांना निवाऱ्यात आणण्यात आले, निवाऱ्याची स्वच्छता, साफसफाई व निर्जंतुकीकरण करून निवारा आकर्षक सजविण्यात आला, बेघरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी, मोतिबिंदू व नेत्र शिबीराचे आयोजन करून त्यात नि:शुल्क औषधोपचार करण्यात आले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बेघर संवाद अंतर्गत बेघरांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी बेघरांना कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या अनुषंगाने मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर याबाबत जागृतीपर मार्गदर्शन करून त्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
जागतिक बेघर दिनानिमित्त कार्यक्रमाला मनपा उपायुक्त श्री प्रकाश वराडे, उपजीविका अभियान व्यवस्थापक श्री प्रमोद खोब्रागड़े, श्री विनय त्रिकोलवर, बार्टीचे प्रकल्प अधिकारी श्री हृदय गोडबोले, समतादूत राष्ट्रपाल डोंगरे, शारदा माकोडे, दिक्षा पवार यांचेसह डॉक्टरवर्ग, कर्मचरिवृंद, बेघर नागरिक उपस्थित होते.