Breaking News

जातीच्या नव्हे तर मानवतेच्या आणि विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : ना. नितीन गडकरी

  • पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्यात फुंकले विजयाचे रणशिंग ,पदवीधरांसह सर्व नेत्यांनी दिला विजयाचा विश्वास

नागपूर, ता. २९ :जात ही नेत्यांच्या मनात आहे. जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात जात नाही. अनेक नेते जातीच्या आधारावर निवडणुकीची तिकीट मागतात. जातीसाठी काय केले, याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. निवडणूक आली की जात वर निघते. मात्र, जात न बघता शोषित, वंचित, पीडितांची सेवा करा. जातीच्या नव्हे तर मानवतेच्या, विकासाच्या राजकारणाला प्राधान्य द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीतर्फे येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश महासचिव तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी, पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी, खासदार विकास महात्मे, खासदार रामदास तडस, खासदार अशोक नेते, खासदार सुनील मेंढे, आमदार सर्वश्री नागो गाणार, गिरीश व्यास, डॉ. परिणय फुके, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, समीर मेघे, दादाराव केचे, पंकज भोयर, विजय रहांगडाले, माजी आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, मिलिंद माने, सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, पदवीधर मतदारसंघावर नेहमीच भाजपचा पगडा राहिला आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व जेव्हा आपल्याकडे होते तेव्हा विदर्भ विकासासाठी आवाज उचलला होता. त्यावेळी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यास सरकारला भाग पाडले. विदर्भाला न्याय मिळवून दिला. मिहानमध्ये ३७६२० तरुणांना नोकरी लागली. पुढील पाच वर्षात हा आकडा एक लाखांवर जाईल, असा आपला शब्द आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाचे राजकारण केले. माणूस हा जातीने मोठा नसतो तर कर्तृत्वाने मोठा होतो. भाजप नेहमीच उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली. संदीप जोशी हे हाडाचे कार्यकर्ता आहे. उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट संघटन, उत्कृष्ट कार्यकर्ता असा उल्लेख करीत संदीप जोशी यांच्यासारख्या कर्मठ कार्यकर्त्याला विदर्भाचा आवाज विधिमंडळात बुलंद करण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे मत देऊन निवडून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. ज्यांनी विजेचा शॉक दिला त्यांना मतांचा शॉक द्या, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकातून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघ पिंजून काढला. महाविकास आघाडीविरोधातील जनतेचा रोष या दौऱ्यातून लक्षात आला. केवळ जातीचे राजकारण करून मते मिळविण्याचे विरोधकांचे मनसुबे आहेत. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मंत्रिपद देऊन भाजपने बहुजन व्यक्तीला न्याय दिला. भाजपमध्ये कार्य करणाऱ्यांचा सन्मान होतो. त्यामुळे जातीपातीच्या अपप्रचाराला बळी पडू नका. संदीप जोशी यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

मतदान करा, सरकारविरोधातील असंतोष व्यक्त करा : देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणावर आणि निष्क्रियतेवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले नितीनजी गडकरी यांनी आपल्या कर्तृत्वाने मंत्री असताना महाराष्ट्र घडविला. विरोधी पक्षात असताना सरकार हलविले. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात काहीही केले नाही. आपल्या सरकारने घेतलेले निर्णय स्थगीत केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतीत धमक्या देण्याशिवाय काहीही केलेले नाही. हे सरकार विदर्भद्वेषी, विदर्भविरोधी आहे. विदर्भात आता जी काही कामे सुरू आहे ती ना. नितीनजी गडकरी आणि केंद्र सरकारच्या निधीमधून सुरू आहेत. ओबीसी समाजासाठी भाजप सरकारने जे केले, ते कुठलेही सरकार करु शकले नाही. ओबीसी महामंडळाला ५०० कोटी दिले. त्यातील २०० कोटी अद्यापही पडून आहेत. ओबीसी मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना आणली. मराठा आरक्षणाचा कायदा करताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. त्या कायद्यात एक कलम टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी आरक्षण घटनात्मक केले. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात काहीही केले नाही. मंत्र्यांचा फायदा आणि जनतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे या सरकारविरोधातील असंतोष मतदानातून व्यक्त करा, असे आवाहन यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. संदीप जोशी यांनी महापौर म्हणून कोरोनाकाळात उत्तम कार्य केले. एकीकडे राज्य सरकारची व्यवस्था कोलमडली असताना त्यांनी नागपुरात रुग्णांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करतानाच उत्तम सेवाकार्य केले. त्यांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे मत देऊन विजयी करा, असे आवाहन केले.

ओबीसींना भाजपने सन्मान दिला : योगेश टिळेकर

भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीने ओबीसींचा नेहमीच सन्मान केला. कुठल्या सरकारने ओबीसींसाठी जे केले नाही ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केले. ओबीसी कार्यकर्त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर नेहमी न्याय दिला. पद देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. विरोधक जाती-जातीत द्वेष पसरविण्याचे कार्य करीत आहे. त्या विखारी प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केला.

अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार : प्रा. अनिल सोले

मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. महापौर, आमदार बनेल असा कधी विचारही केला नाही. मात्र पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्याला हा सन्मान दिला. पक्षातील विविध पदांवर विराजमान करून माझ्यावर विश्वास टाकला. माझ्यासाठी पहिले पक्ष आहे. ज्या पक्षाने मला एवढे दिले, त्या पक्षाविरोधात कधीही काम करणार नाही. विरोधकांनी माझ्या फोटोचा वापर करून सोशल मीडियावर माझ्या नावाने अपप्रचार सुरू केला. त्यांच्याविरोधात आपण बजाजनगर पोलिसांत तक्रार केली असून अशा अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : संदीप जोशी

यावेळी बोलताना पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संदीप जोशी म्हणाले, मी उत्तम कार्याचा ध्यास घेतलेला ध्येयवादी कार्यकर्ता आहे. जे करायचे ते बोलतो आणि करून दाखवितो. आज माझा वचननामा प्रसिद्ध झाला. या वचननाम्यात जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. मतदारांच्या आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमचा सेवक म्हणूनच अखेरपर्यंत कार्य करीन, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

वचननाम्याचे प्रकाशन

नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांचा वचननामा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, पदवीधरांचा सन्मान आणि त्यांच्या समस्यांना प्राधान्य, बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे, स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करण्यासह विभागातील विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा, स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ स्थापन व्हावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे वचन त्यांनी ‘वचननाम्या’तून दिले आहे. संदीप जोशींचा हा वचननामा पाच सूत्री आणि ४२ कलमी असून पदवीधर मतदारसंघाशी संबंधित बहुधा सर्वच मुद्दे या वचननाम्याच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. एक प्रगल्भ आणि अभ्यासपूर्ण असा हा वचननामा आहे. पाच सूत्री अर्थात पाच घटकांखाली (शीर्षकाखाली) ४२ प्रमुख मुद्यांना धरून विजयी झाल्यास ते आपल्या कारकिर्दीत कार्य करणार आहे. वचननाम्याच्या माध्यमातून दिलेले वचन पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करणे आणि ते तडीस नेणे, हा संकल्प यानिमित्ताने संदीप जोशी यांनी केला आहे.

राजेंद्र पडोळे यांचा भाजप प्रवेश

तेली समाजातील पदाधिकारी व बहुजन समाज पार्टीचे वरिष्ठ नेते प्रदेश महासचिव उच्चशिक्षित राजेंद्र पडोळे यांनी आज भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. राजेंद्र पडोळे यांनी सन २०१४ मध्ये नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून बसपातर्फे निवडणूक लढविली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा दुपट्टा आणि तुळशीचे रोप देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved