नागपूर, ता. २७ : कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लू या आजाराचे या वर्षात एकूण २० रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैकी १६ रुग्ण नागपूर महानगरपालिका हद्धीतील असून ४ रुग्ण शहराबाहेरील आहेत. मागील काही दिवसापासून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. महानगरपालिका साथरोग विभागाकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील वेगवेगळया भागात निवासी असलेले एकूण १८ रुग्णांचा सकारात्मक अहवाल प्रयोगशाळा तपासणीत आढळून आला.
स्वाईन फ्लू हा तसा सौम्य आजार असला तरी जोखमीचे गटातील जसे जेष्ठ नागरीक, गर्भवती स्त्रिया, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा प्रतिकारशक्ती क्षीण असणा-या व्यक्तीमध्ये हा आजार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. त्यामुळे जीवाला धोका सुध्दा होऊ शकतो. करीता नागरीकांनी सतर्क राहावे, असे आवाहन साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, स्वाईन फ्लूवर खात्रिशीर औषधोपचार उपलब्ध आहेत. लवकर व वेळीच निदान झाल्यास वेळेवर औषध सुरु करता येते. सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फलू सदृष्य लक्षणे असल्यास कोव्हिड सोबत स्वाईन फ्लू तपासणी करणे आवश्यक आहे. नागपूर महानगरपालिकेची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ही तपासणी मोफत केली जात आहे. सध्यास्थितीत शहरात २० रुग्णाबाबत माहिती मिळाली असून त्यापैकी ८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत १२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
मनपा तर्फे विशेष हेल्पलाईन
स्वाईन फ्लू, मंकीपॉक्स आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेव्दारे विशेष हेल्पलाईन क्रमांक 9175414355 जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध राहिल, असेही डॉ.गोवर्धन नवखरे यांनी सांगितले.
स्वाईन फ्लू टाळण्याकरीता हे करा
हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
गर्दीमध्ये जाणे टाळा.
स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा.
खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा.
भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी.
पौष्टीक आहार घ्यावा.
हे करु नका
हस्तांदोलन अथवा आलिंगन,
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे.