
नागपूर, दि.20 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 14 लाख नागरिकांचे आधार अद्यावतीकरण बाकी असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय आधार संनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये निदर्शास आले आहे. ऑक्टोंबर 2022 पासून शासनाने आधार अद्यावतीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु आतापर्यंत खूप कमी नागरिकांनी आधार अद्यावतीकरण केले आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाच्या जवळपास सर्व शासकीय योजनामध्ये आधार हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. सर्वांचे आधार अचूक असावेत, यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.
आधार कार्डवरील पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेट असणे आवश्यक आहे. 10 वर्षापूर्वी ज्यांनी आधार कार्ड काढले, त्या वेळचा पत्ता ही तोच आहे, मोबाईल क्रमांक ही बदलला नाही, अशा नागरिकांनाही आता ऑनलाईन व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे.
आधारच्या संकेतस्थळावरून (https://uidai.gov.in/) किंवा myaadhaar वर जाऊन आधार ऑनलाईन अपडेट केल्यास 14 जून पर्यंत कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच, आपले सरकार सेवा केंद्रावर 50 रुपये शुल्क आकारले जाईल.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी सुजाता गंधे यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डच्या अद्यावतीकरणाची ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.