
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना पुरस्कार प्रदान
नागपूर, ता. २० : राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२०) मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत विजेते ठरलेल्या नागपूर महानगरपालिकेला पुरस्कार स्वरूपात १५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
मुंबई येथील एनसीपीए सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मनपा आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय गुल्हाने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये आयोजित शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेकरिता सुंदर जलाशय/पाणीसाठे, सुंदर हिरवे पट्टे/जागा, सुंदर पर्यटन/वारसा स्थळ, सुंदर बाजार/व्यावसायिक ठिकाण या चार बाबींवर मूल्यांकन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे, शहरातील तलाव, ऐतिहासिक स्थळे, वारसा स्थळे, शहरातील वृक्षआच्छादन असलेली स्थळे यासोबतच स्वच्छतेसंबंधी राबविण्यात येणारी प्रकल्प आदींची माहिती स्पर्धेद्वारे सादर केली. याशिवाय जी-२० शिखर परिषदेच्या अनुषंगाने शहरात करण्यात आलेले सौंदर्यीकरण व निर्माण करण्यात आलेल्या सौंदर्यस्थळांची देखील माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आली.
स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी शासनाद्वारे विभागीय स्तरावर छाननी समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षस्थान विभागीय आयुक्त होते. सदस्य म्हणून जिल्हाधिकारी, विभागातील मान्यताप्राप्त वास्तूविशारद, मान्यताप्राप्त कलाकार तर सदस्य सचिव म्हणून प्रादेशिक उपसंचालक, विभागीय आयुक्त कार्यालय यांचा समावेश होता. नागपूर विभागीय छाननी समितीपुढे मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी नागपूर शहरातील सौंदर्यीकरण कार्याचे सादरीकरण दिले. यानंतर समितीद्वारे माहिती राज्य शासनाकडे पाठविण्यात आली.
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये “अ” व” ब” वर्ग महानगरपालिका गटामध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर द्वितीय क्रमांक ठाणे महानगरपालिका व तृतीय क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्राप्त केला आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी या प्रमाणे पारितोषिक देण्यात आले.
नागपूर शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाच्या स्वच्छता कर्मचा-यांची महत्वाची भूमिका आहे. मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, झोनचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सर्वांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच हे यश मिळविता आले असल्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. नागपूर महानगरपालिकेला मिळालेल्या या यशासाठी संपूर्ण शहरवासीयांसोबतच अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे यांचेही आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.