
– जिल्हा उपनिबंधक अजय कडू
नागपूर, दि.22 : सोयाबिन हे स्वपरागसिंचीत पीक असून राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 ते 3 वर्षापर्यंत वापरता येते.
मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणीत बियाण्यापासून उत्पादीत होणारे सोयाबिन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. यासाठी सोयाबिन उत्पादक जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धान्य तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे.
या संदर्भात कृषी विभागामार्फत पुढील खरीप हंगामासाठी बियाणे जतन करुन ठेवण्याबाबत मोहिम घेऊन शेतकऱ्यांमध्ये जाणीव व जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांचा सुध्दा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु पुढील हंगामासाठी म्हणजेच 7 ते 8 महिने बियाण्याकरीता सोयाबिन राखून ठेवणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया अडचणीचे होते. त्याकरीता धान्य तारण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाल्यास त्यांची आर्थिक अडचण दूर होऊ शकते, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी सांगितले आहे.