नागपूर, दि.22 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधारकार्ड प्रमाणीकरण केलेले नाही त्यांनी योजनेचा लाभ मिळण्याकरीता तात्काळ आपले आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे.
नागपूर जिल्हयातील शेतीपीककर्ज वाटप करणाऱ्या सर्व बँकांनी शासनाच्या पोर्टलवर एकूण 50 हजार 383 शेतीकर्जधारकांची माहिती अपलोड केली आहे. यापैकी 44 हजार 415 व्यक्तींनी कर्जमाफीचा विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्यापैकी आतापर्यंत 43 हजार 552 कर्जधारकांनी सेतूकेंद्रावर किंवा बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण केले आहे. त्यांचेपैकी 42 हजार 689 व्यक्तींचे कर्ज शासनाने माफ करुन त्यांचे कर्ज खात्यात 365.23 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे.
उर्वरित 863 व्यक्तींनी अद्यापही सेतुकेंद्रावर किंवा बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यामुळे या 863 व्यक्तींची अद्यापही कर्जमाफी होऊ शकली नाही. कर्जमाफीच्या यादीत विशिष्ट क्रमांक मिळालेल्या कर्जधारक व्यक्तींनी विशिष्ट क्रमांक, आधारकार्ड व बँक खात्याचे पासबुक घेऊन सेतुकेंद्रावर किंवा बँकेत जाऊन स्वत:चे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेती पीककर्जधारक व्यक्तींनी तातडीने स्वत:चे आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे.