
नागपुर :- शुक्रवारी शिवसेना पदाधिकारींची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शनिवारी प्रभाग क्रमांक २६ (ब) च्या एका नगरसेविका तसेच नेहरूनगर झोनच्या सभापती असलेल्या समिता चकोले यांच्या पतीने एका कंत्राटदाराकडून कमिशन मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये नगरसेविकेचे पती राजेंद्र चकोले हे कंत्राटदार नीलकंठ बेलखोडे यांना कमिशन मागत असल्याचे स्पष्ट होत आहे.
यासंदर्भात राजेंद्र चकोले यांनी संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये आपला आवाज नसल्याचे सांगत, हे विरोधकांचे कारस्थान असून आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, ज्यांनीही असे केले त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले. तर कंत्राटदार बेलखोडे यांनी क्लिपमधील संभाषण खरे असल्याचा दावा केला आहे. सदर प्रकरणात कोण खरे आणि खोटे बोलतेय याबाबतची स्पष्टता अद्यापही झालेली नाही. चकोले यांनी आपल्याला मोबाईलवरून बेलखोडे यांना विकासकामाचे कमिशन मागतिले व धमकावल्याचे क्लिपमधून स्पष्ट होत आहे.